एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

27

सामना ऑनलाईन, मुंबई

भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माजी महसूलमंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करून चौकशी करा असे आदेश उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयाने कडक भूमिका घेतली. अखेर चालढकल करणाऱ्या राज्य सरकारने हा तपास एसीबीकडे सोपविण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मंत्रीपदाचा दुरुपयोग करून १०० कोटी रुपयांची जमीन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केवळ ३ कोटी ७५ लाख रुपयांमध्ये यांनी पत्नी व जावयाच्या नावावर खरेदी केली. त्याची तक्रार बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केली. मात्र त्या तक्रारीची पोलिसांकडून दखल घेतली गेली नाही म्हणून गावंडे यांच्या वतीने ऍड. एस. एस. पटवर्धन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

पोलिसांनी तक्रारीत तथ्य नसल्याने तक्रार बंद केल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. एस. एस. पटवर्धन यांनी निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त करून तुम्ही गुन्हा दाखल करता का आम्ही आदेश द्यावा अशी कडक भूमिका घेतली. यावेळी सरकारी वकील ऍड. नितीन प्रधान यांनी पोलिसांनी घेतलेला निर्णय मागे घेऊन हे प्रकरण एसीबीकडे सोपविण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.

काय आहे व्यवहार…

भोसरी येथील उकाणी कुटुंबाची जमीन राज्य सरकारने १९७१ मध्ये संपादित करून एमआयडीसीच्या ताब्यात दिली. त्यानंतर सुमारे ४० वर्षांनंतर २०१० मध्ये उकाणी कुटुंबांनी संपादित केलेली जमीन परत मिळावी अथवा त्या जमिनीचा मोबदला द्यावा अशी विनंती करणारा अर्ज राज्य सरकारकडे केला. या अर्जाची तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी दखल घेतली. तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून उकाणी कुटुंबीयांना जमीन परत द्या अथवा २०१३ च्या कायद्यानुसार नुकसानभरपाई द्या असे आदेश दिले. या आदेशानंतर २८ एप्रिल रोजी ही जमीन खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे पावणेचार कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचे उघड झाले.

आपली प्रतिक्रिया द्या