बाबा सिद्दिकी यांच्या पत्नीचा जबाब पोलिसांनी का नाही नोंदवला? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी शेहझीन यांनी पोलिसांनी केलेला तपास अर्धवट, दिशाभूल करणारा आणि हत्येमध्ये सामील झालेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी नंतर सोडून देण्यात आला असा दावा केला होता, मात्र वांद्रे पोलिसांनी त्यांचा हा जबाब का नोंदवून घेतला नाही, असा सवाल करत हायकोर्टाने राज्य सरकारला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी (66) यांची गोळ्या घालून हत्या केली. लॉरेन्स बिष्णोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून 26 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, तर अनमोल बिष्णोई आणि इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व आरोपींवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी आणि एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा दाट संशय शेहझीन यांनी याचिकेद्वारे व्यक्त केला आहे. संशयित गुन्हेगारांचे सध्याच्या सत्ताधारी राज्य सरकारशी संबंध आहेत आणि म्हणूनच चौकशी स्वतंत्र तपास संस्थेद्वारे करावी, असे याचिकेत म्हटले आहे.