वृद्ध कलावंतांचा `टेक’ ओके! सेटवर काम करण्याची बंदी हायकोर्टाने उठवली

501

कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून घरात बंदिस्त असलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ कलाकारांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. या कलाकारांना सेट वर काम करण्यापासून रोखणे आणि त्यांच्या हक्कांवर मर्यादा आणणे योग्य नाही असे स्पष्ट करत सरकारकडून ज्येष्ठ कलाकारांवर घालण्यात बंदी हायकोर्टाने आज उठवली. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे 65 वर्षावरील कलाकारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून सेटवर काम करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

लॉकडाऊन दरम्यान टीव्ही कलाकारांना चित्रीकरणासाठी राज्य सरकारने 30 मे रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार 65 वर्षावरील कलाकारांना चित्रपट अथवा सिरियलच्या सेटवर काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेत 70 वर्षीय प्रमोद पांडे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने आज आदेश जारी केले.

हायकोर्टाचे निरीक्षण
सरकार एकीकडे 65 वर्षावरील नागरिकांना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देतेय तर दुसरीकडे मात्र वृद्ध कलाकारांना चित्रपट अथवा सिरियलच्या सेट वर काम करण्यापासून रोखतेय. हा तर एक प्रकारचा भेदभाव.
कलाकारांना कामा अभावी आपली गुजराण करणे कठीण जात आहे.
65 वर्षावरील तंदुरुस्त नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालत असाल तर अशा व्यक्तींकडून सन्मानित जीवन जगण्याची अपेक्षा सरकार कशी काय करू शकते.

याचिकाकर्त्यांचा दावा
पांडे हे मागील 40 वर्षांपासून विविध चित्रपट, टिव्ही मालिकांमध्ये काम करीत आहेत. अभिनय हाच त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे. पांडे याचे वय 70 असूनही त्यांची प्रकृती उत्तम आहे. तरीही सरकारच्या मार्गदर्शक तत्वांमुळे त्यांना सेटवर चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या बंदीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या