कांजूर गावात मेट्रो कारशेड उभारायला कोर्टाची परवानगी

कांजूर गावात मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक हिताशी संबंधित असून सर्वसामान्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बांधला जात आहे असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला मंजुरी दिली.

श्री स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान मेट्रो 6 चे बांधकाम एमएमआरडीएने हाती घेतले असून कांजूर गावात मेट्रो खांबांचे बांधकाम सुरू करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला निर्देश द्यावेत अशी मागणी करत एमएमआरडीएने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले की, या प्रकल्पामुळे 34 बिगर-खारफुटी झाडे प्रभावित होतील आणि काही वनजमिनी वळवाव्या लागतील, ज्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. तसेच भरपाई म्हणून झाडे लावण्यात येणार असून मनोरी येथे 0.10 हेक्टर जागा राखीव ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.