सोनू सूदला हायकोर्टाचा दणका, बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली

जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीत हॉटेल थाटणाऱ्या अभिनेता सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. या बांधकाम प्रकरणी दाद मागण्यासाठी अनेकदा संधी देण्यात आली मात्र याचिकाकर्त्याने कोर्टात येण्यास फार उशीर केला असे स्पष्ट करत न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी बेकायदा बांधकाम वाचवण्याची सोनूने केलेली मागणी आज फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर कायदा हा मेहनती लोकांच्या सदैव पाठीशी आहे. स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांच्या नाही असे खडे बोलही सुनावले.

जुहू येथील शक्तीसागर या सहा मजली निवासी इमारतीत सोनू सूद याने बेकायदेशीरपणे बांधकाम करत हॉटेल सुरू केले. या प्रकरणी पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने पालिकेने सोनू सूदला नोटीस पाठवली. पालिकेच्या नोटीसीविरोधात सोनूने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र दिवाणी न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावल्याने सोनूने अॅड. डी.पी.सिंग यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर  न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी राखून ठेवलेला निकाल आज जाहीर केला. सूद यांचे वकील अमोघ सिंग यांनी पालिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बजावलेल्या नोटीस विरोधात दाद मागण्यासाठी 10 आठवडय़ांचा अवधी मागितला तसेच पालिकेला या बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने देण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. आता चेंडू पालिकेच्या कोर्टात आहे असे स्पष्ट करत न्यायमूर्तींनी पालिकेकडे दाद मागण्याची सूचना सोनूला केली व याचिका फेटाळून लावली.

कारवाईचा मार्ग मोकळा

सोनू सूदच्या बेकायदा बांधकामावर 12 नोव्हेंबर 2018 तसेच 14 फेब्रुवारी 2020 रोजी पालिकेने कारवाई केली आहे.  त्यानंतर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम सोनूने उभारले. आता हायकोर्टाने सोनूची याचिकाच फेटाळून लावल्याने पालिकेच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या