मालवण किनारपट्टीवर घुसखोरी, मलपी येथील हायस्पीड पोलिसांच्या जाळ्यात

मालवण किनारपट्टीवर घुसखोरी केलेली कर्नाटक मलपी येथील हायस्पीड मासेमारी बोट. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी, मालवण

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करुन अनधिकृत मासेमारी करणाऱ्या मलपी (कर्नाटक) येथील एका हायस्पीड नौकेला सिंधुदुर्ग सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मालवण-सर्जेकोट बंदरापासून अकरा वाव खोल समुद्रात गुरुवारी सकाळी सागरी पोलिसांनी ही कारवाई केली.

दरम्यान हायस्पीड नौका मालवण बंदरात आणुन मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. नौकेत बांगडा, बळा, म्हाकुल, सौंदाळा, धोडी आदी प्रकारची मासळी सापडली. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून मासळी लिलाव प्रक्रियेनंतर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव शुक्रवारी मालवण तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

देवगड पाठोपाठ मालवण येथील सागरी पोलिसांनी गस्ती दरम्यान अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकेला जेरबंद केल्याने स्थानिक मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले. मच्छिमारांनी थेट पकडलेल्या नौकेवर जाऊन पोलीस अधिकारी – कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

सर्जेकोट समुद्रात सागरी पोलिसांच्या ‘सिंधुदुर्ग -५’ या गस्ती नौकेने गस्ती दरम्यान हायस्पीड नौकेला अनधिकृत मासेमारी करत असताना ११ वाव खोल समुद्रात पकडले. बोट पकडल्याची माहिती सागरी पोलीस उप निरीक्षक अनिल साठे यांनी मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके व मत्स्य विभागाला दिली. त्यानंतर नौका मालवण बंदरात आणून पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. कर्नाटक येथील गणेश पालन यांच्या मालकीची ‘कस्तुरी फिशरर्स बाबा’ ही नौका असल्याचे स्पष्ट झाले. १२ नॉटिकल मैल पर्यंत सुमारे २२ ते २५ वाव पर्यंत समुद्री क्षेत्र महाराष्ट्र सागरी हद्द म्हणून ओळखली जाते. या हद्दीत अन्य राज्यातील बोटींना मासेमारी करण्याची परवानगी नसते. राज्यातील स्थानिक परवानाधारक मासेमारी बोटींना हे क्षेत्र राखीव असते. असे असताना कर्नाटक मलपी येथील बोटींनी घुसखोरी केली त्यामुळे कारवाई करण्यात आली.

सागरी पोलिसांची कारवाई
सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे, विलास तोरसकर, सोमनाथ पवार, ए. जी. ढोलये, जवूर शिरगावकर, हरिश्चंद्र जायभाय, संदीप सरकुंडे आदींच्या पथकाने कारवाई केली. तर मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, विल्सन डिसोझा, आशिष भाबल, भाऊ नाटेकर यांनी पंचनामा केला.

हायस्पीड मत्स्य विभागाच्या ताब्यात
मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी श्रीकांत वारुंजीकर हे बोट मालवण बंदरात आल्यानंतर बोटीवर पोहचले. बोट ताब्यात घेत मासळीचा पंचनामा केला. मासळीचा लिलाव पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पाच पट दंड रकमेचा कारवाई प्रस्ताव शुक्रवारी तहसीलदार यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार वैभव नाईक ‘हायस्पीड’ वर
मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांना सागरी पोलिसांनी हायस्पीड नौका पकडल्याची माहिती मिळताच त्यांनी बंदरात उभ्या असलेल्या हायस्पीड नौकेवर जावुन मत्स्य अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना केल्या.

स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान
शेकडोंच्या संख्येने हे हायस्पीड मालवण किनारपट्टीवर घुसखोरी करत आहेत. मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. आम्हा स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे हे हायस्पीड नुकसान करतात. आजही १५ ते २० जाळ्यांचे नुकसान झाल्याची माहिती. सर्जेकोट येथील मच्छिमारांनी आमदार वैभव नाईक व मत्स्य अधिकारी यांना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या