शिपाई आणि चालकपदासाठी एम टेक, एमबीए तरुणांचाही अर्ज

चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक पोलीस फुटबॉल मैदानावर 2 जानेवारीपासून पोलीस भरतीला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात चालक शिपाई पदासाठी चाचणी घेण्यात आली. शिपाई पदासाठीची शारीरिक क्षमता चाचणी सुरू झाली आहे.या दरम्यान जिल्ह्यातील तरुणांभोवती बेरोजगारीचा फेरा किती करकचून आवळला आहे याचे उदाहरण पाहायला मिळाले. शिपाई आणि ड्रायव्हरपदासाठी एमटेक, एमबीए, बीफार्म, बीई झालेल्या तरुणांनीही अर्ज केला आहे. शिपाई पदाच्या 194 जागांसाठी 24 हजारांहून अधिक अर्ज आले असून यात 6936 महिला तर 17 हजाराहून अधिक पुरुष उमेदवार आहेत. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या एकूण शैक्षणिक गुणवत्तेवर नजर टाकल्यास धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.

  • 3-एम.टेक
  • 324-बी.ई
  • 76-एमबीए
  • 9-बी.फार्म
  • 120-बीसीए
  • 66-बीएड
  • 335-एम कॉम
  • 4-एलएलबी
  • 90-एम.एस.डब्ल्यू

याशिवाय आर्टस, कॉमर्स आणि विज्ञान शाखेच्या पदवीधर उमेदवारांची संख्याही मोठी आहे.  या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी ठेवण्यात आली आहे, मात्र नोकऱ्या मिळत नसल्याने हे तरुण मिळेल ती सरकारी नोकरीची संधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे उच्चविद्या विभूषित उमेदवार मिळत असल्याने पोलीस दलाला त्याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.