अंधश्रद्धेचा कळस, नगराध्यक्षांच्या घरासमोरच तिरडीचा उतारा

45

सामना ऑनलाईन । लोणावळा

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण निश्चित करून तसेच मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरडी याचा उतारा खुद्द त्यांच्याच घराच्या दरावाजापुढे आढळून आला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अंधश्रद्धेचा कळस गाठणारी ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सध्या केरळला गेल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरासमोर असा घृणास्पद आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार घडला आहे. सदर उताऱ्यात एका कागदावर सुरेखा जाधव यांच्या नावाचा उल्लेख असणारे एक मृत्यू यंत्र रेखाटण्यात आलेले आहे. त्यावर जाधव यांच्या मृत्यूची दिनांक, वेळ, ठिकाण आणि कारण या सर्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २५ एप्रिल २०१७) सकाळी ११ वाजून ८ मिनिट या वेळेवर तुंगारली येथील नगरपरिषद कार्यालयात जाधव यांचा अटॅकने मृत्यू होणार असल्याचे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे.

लोणावळा पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हा उतारा त्याठिकाणावरून हटवला आहे. याबाबत जाधव यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आपला या असल्या अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नसल्याचे सांगितले. परंतु असल्या अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि समाजात वाईट गोष्टींचा पायंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कडक पोलीस कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या