हिमाचलच्या चंबामधल्या 21 विद्यार्थ्यांची एसटीमुळे पालकांशी भेट घडली!

608

एसटी महामंडळाचा बहाद्दर कामगारांच्या प्रयत्नाने हिमाचल प्रदेशातील चंबा येथे अडकलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची आज अखेर सुटका झाली आहे. कोरोना साथीमुळे लॉकडाऊन घोषीत झाल्यामुळे गेले महिनाभर हे विद्यार्थी चंबा येथे अडकून पडले होते. राजस्थानच्या टोंकपर्यंत त्यांना आणून सोडले होते. तेथून गुरूवारी सकाळी एसटीच्या शिवशाही बसने त्यांना बुलढाण्यातील शेगाव येथे सुखरुपपणे आणण्यात आले.

कोरोना लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसटीने परराज्यात जाऊन सुखरूपपणे त्यांच्या मुळगावी पोहचविण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. नुकत्याच राजस्थानच्या कोटा येथे परीक्षेच्या तयारीसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एसटीने सुखरुप घरी परत आणले. त्यानंतर राजस्थानच्या राजगढ येथे जाऊन उत्तर प्रदेशातील उन्नावच्या विद्यार्थ्यांची पाठवणूक करतानाच नगर-पारनेरच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या 16 विद्यार्थ्यांनाही सहीसलामत परत आणले.

हिमाचल प्रदेशातील चंबा येथे अडकलेल्या 21 विद्यार्थ्यांना राजस्थानच्या टोंक येथून घेऊन शिवशाही बस गुरूवारी सकाळी शेगाव आगारात पोहचली. 4 मे रोजी शेगाव आगाराचे चालक शिवशाही बसने प्रवासाला निघाले होते.  नवोदय विद्यालयाच्या या विद्यार्थ्यांमध्ये 12 मुले आणि 9 मुलींचा समावेश आहे. शेगाव आगारातील शिवशाही बसचे ड्रायव्हर एस.एन.दुबे आणि एम.एच.आडे हे राजस्थानच्या टोंक येथून गुरूवारी सकाळी बुलढाण्यातील शेगाव येथे सुखरुप पोहोचल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या बसेसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळ गावी परत आणले गेले.

एसटी महामंडळाने कोरोना संकटामुळे थांबविलेली वाहतूक आता केंद्राच्या नव्या नियमानुसार  ग्रीन झोन असलेल्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात सुरू केली आहे. एसटी सध्या दर कि.मी. 44 रुपये भाडे आकारणी करुन राज्यात अडकलेल्या नागरीकांना मदत करीत असल्याची माहिती महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक) राहुल तोरो यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या