साय-फाय – हिंदु‘स्थान आणि चीनच्या स्पर्धेमुळे हिमालय धोक्यात

>>प्रसाद ताम्हनकर

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड जिह्यात असलेले चमोली गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2021 साली या गावात झालेल्या हिमस्खलनामुळे 200 लोकांचा मृत्यू झाला होता. ही घटना पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत जोशीमठ आणि आजूबाजूच्या परिसरातील जमिनीवर पुन्हा नव्याने भेगा दिसायला लागल्या आहेत. फक्त हे शहर नाही, तर हिमालयातील इतर भागांत आणखी विदारक चित्र समोर येत आहे.

शास्त्रज्ञांचे मत विचारात घेतले तर ग्लोबल वार्ंमगमुळे हा नाजूक प्रदेश आणखी अस्थिर होत आहे. कारण वाढत्या तापमानामुळे हिमनद्या आणि पर्माफ्रॉस्ट वितळत आहेत.

याच ठिकाणी नवीन महामार्ग आणि रेल्वे रूळ टाकले जात आहेत, बोगदे खोदले जात आहेत. एवढेच नाही, तर हिमालयाच्या दोन्ही बाजूला धरणे आणि हवाई पट्टी बांधली जात आहे. चीन आणि हिंदुस्थान ज्या गतीने हिमालयीन प्रदेशात पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत, त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षणीय वाढू शकतो असा इशारा शास्त्र्ाज्ञ देत आहेत. हिंदुस्थान आणि चीनमध्ये सामायिक पसरलेल्या या 3 हजार 500 किलोमीटर क्षेत्राचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

‘नॅचरल हॅझर्डस् ऍण्ड अर्थ सिस्टम सायन्स’ या जर्नलमध्ये गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या कालावधीत उत्तराखंड राज्यातील NH-7 राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने प्रत्येक किलोमीटरवर आंशिक किंवा पूर्ण रस्ता उद्ध्वस्त करणारे भूस्खलन झाले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, चीनच्या दिशेने हिमालयीन प्रदेशात नैसर्गिक आपत्तीचा धोका हिंदुस्थान इतकाच जास्त आहे. पर्माफ्रॉस्ट वितळल्याने या भागात बांधलेल्या पायाभूत सुविधांना मोठा धोका निर्माण झाला आहे. ‘कम्युनिकेशन्स अर्थ ऍण्ड एन्व्हायर्नमेंट’ या जर्नलमध्ये गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, किंघाई तिबेट पठारावर सुमारे 9 हजार 400 किलोमीटर रस्ते, 580 किलोमीटर रेल्वे, 2 हजार 600 किलोमीटरहून अधिक वीजवाहिन्या आणि हजारो इमारती पर्माफ्रॉस्ट झोनमध्ये आहेत.

2020 मध्ये तिबेटमधील बोमी काऊंटीमध्ये गेल्या दशकामध्ये बांधलेले सर्व पूल, रस्ते आणि दूरसंचार सुविधा एका मोठय़ा भूस्खलनाने नष्ट केल्या होत्या, तर या महिन्याच्या सुरुवातीला तिबेटमधील मेडोग काऊंटीमध्ये एका सुरुंगातून बाहेर पडण्यासाठी बनवलेला रस्ता हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडल्याने 28 लोकांचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱया अशा घटनांकडे पूर्ण दुर्लक्ष करत चीन मात्र इथे बांधकामाचा वेग वाढवत चालला आहे.

एकीकडे चीनच्या दक्षिणेकडील प्रदेशात नवीन वसाहती दिसू लागल्या असताना हिंदुस्थानच्या बाजूने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमसारख्या राज्यांमध्ये जलविद्युत प्रकल्पांचे बांधकाम जोरात सुरू झाले आहे, परंतु ही अशी राज्ये आहेत, जिथे 2009 ते 2020 दरम्यान हिमनद्या वितळल्यामुळे तलाव आणि जलस्रोतांचा विस्तार दिसून आला आहे. अमेरिकन जिओफिजिकल युनियनने 2020 मध्ये एक अभ्यास प्रकाशित केला, ज्यामध्ये असे आढळून आले की, हिंदुस्थानातील 23 हिमनदी तलावांपैकी तब्बल 17 एकटय़ा सिक्कीम राज्यात आहेत.

हिंदुस्थान व चीनमधील वाढते राजकीय वैर, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेली स्पर्धा आणि त्यामुळे आपले लष्करी सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी होत असलेले जोरदार प्रयत्न या सगळय़ामध्ये हिमालयाचा श्वास मात्र कोंडत चालला आहे. आधीच काहीसा नाजूक आणि संवेदनशील असलेला इथला परिसर अनावश्यक बांधकामांमुळे अधिक धोकादायक बनत चालला आहे. आपण हिमालयाला धोक्याच्या काठावर नेऊन उभे केले आहे, असा थेट इशारा शास्त्र्ाज्ञ देत आहेत. येणाऱया काळात हिमालयातील अनेक भागांत पूर्वीपेक्षादेखील अधिक भीषण संकट कोसळण्याची धास्तीदेखील व्यक्त होत आहे.

[email protected]