हायमास्टच्या दिव्याखाली अंधार; शिवसेनेनं जाब विचारला

15
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

रस्त्यांवर भरपूर उजेडासाठी पालिकेने बसवलेले हायमास्ट दिवे बऱ्याच ठिकाणी बंद पडले असून या दिव्यांखाली अंधार असल्याची वस्तुस्थिती शिवसेनेने स्थायी समितीमध्ये उघडकीस आणली. या दिव्यांच्या देखभालीचे कंत्राट संपले असून आता देखभाल नक्की कोणी करायची याबाबत अधिकाऱ्यांना काहीच माहीत नसल्याचीही धक्कादायक बाब पुढे आली आहे.

दिव्यांची देखभाल होत नसल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी उपस्थित केला. अंधेरी परिसरात बेहरामबाग, आनंद नगर परिसरात हायमास्ट दिवे बंद असून रिलायन्स एनर्जी आणि पालिका यांच्यापैकी नक्की कोणी ही देखभाल करायची हे स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती असून प्रशासनाने याबाबत उत्तर द्यावे असे निर्देश देऊन अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा मुद्दा राखून ठेवला.

देखभाल विद्युत कंपन्यांकडे
महापालिकेने तयार केलेल्या धोरणानुसार यापुढे बेस्ट, महावितरण आणि रिलायन्स यांच्यावर हायमास्टच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचा खर्च कंपनीद्वारे महापालिकेला दिल्या जाणाऱ्या मासिक देयकात जोडला जाणार आहे. मात्र अनेक वॉर्ड कार्यालयांनी संबंधित कंपन्यांना तसा प्रस्तावच पाठवला नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याचे राजुल पटेल यांचे म्हणणे आहे.
एकूण हायमास्ट दिवे : २१६
शहर विभागामध्ये : ४६
पूर्व उपनगरामध्ये : ७४
पश्चिम उपनगरामध्ये : ९६

आपली प्रतिक्रिया द्या