रिझर्व्ह बँकेने मागवला बँकांकडून तपशील, अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती देण्याचे निर्देश

हिंडेनबर्ग कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाला रोज नवे हादरे बसत आहे. या समूहातील कंपन्यांच्या समभागात रोज घसरण होत असून याचा परिणाम शेअर बाजारावरही होत असल्याचे दिसून आले आहे. या घडामोडी सुरू असताना रिझर्व्ह बँकेनेही सावध पावले उचलायला सुरुवात केली असून आरबीआयने सगळ्या बँकांकडून तपशील मागवला आहे. अदानी समूहाला किती कर्ज दिलं आहे त्याचा तपशील या बँकांकडून मागवण्यात आला आहे. अदानी समूहाने बँकांकडून किती कर्ज उभं केलं आहे, याचा अंदाज बांधण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे.

मुदत कर्जे, खेळते भांडवल आणि इतर प्रकारचे आर्थिक सहाय्य मिळून अदानी समूहाच्या एकूण कर्जाच्या 38 टक्के कर्ज हे बँकांकडून मिळालेले आहे. रोखे, कमर्शिअल पेपर मिळून 37 टक्के कर्जे आहेत तर 11 टक्के कर्जे ही वित्तीय संस्थांकडून घेतलेली आहेत. उरलेली 12-13 टक्के कर्जे ही समूहाने एकमेकांना दिलेली आहेत असं सीएसएलएने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अदानी समूहाला ज्या बँकांनी कर्जे दिली आहेत त्यामध्ये पंजाब नॅसनल बँकेचाही समावेश आहे. या बँकेने समूहाला 7 हजार कोटींचे कर्ज दिले आहे. इंडसइंड बँकेनेही समूहाला कर्ज दिले आहे. सध्याच्या घडीला अदानी समूहावर एकूण मिळून 30 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज असून त्यातील 4 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज हे रोख स्वरुपातील आहे. 30 दशलक्ष डॉलर्स कर्जापैकी 9 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज हे हिंदुस्थानी बँकांकडून घेतलेले आहे.

1फेब्रुवारी रोजी अदानी समूहाच्या समभागांची मोठी घसरण झाली होती. यामागे काही गडबड आहे याची सेबी सध्या चौकशी करत असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या समभागांची घसरण झाल्याने कंपनीच्या नुकसानीचा आकडा 86 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.

अदानी समूहाने ‘एफपीओ’ रद्द केल्याने अर्थविश्वात खळबळ

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने 24 जानेवारीला जाहीर केलेल्या अहवालाचा अदानी शेअर्सवर नकारात्मक परिणाम सुरूच राहिल्यामुळे शेअर बाजारात आणलेला 20 हजार कोटींचा एफपीओ अखेर रद्द करण्याचा निर्णय अदानी समूहाने बुधवारी रात्री उशिरा घेतला. एफपीओमध्ये गुंतवलेले पैसे गुंतवणूकदारांना परत केले जाणार आहेत. अदानी समूहाच्या या निर्णयामुळे आर्थिक विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

अदानी समूहाने 25 जानेवारीला अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ जारी केला होता. गुंतवणूकधारकांना त्यात 31 जानेवारीपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी दिली होती, पण हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एफपीओ रद्द घेण्याचा निर्णय घेतला. 1994 साली अदानी समूहाने आपला आयपीओ बाजारात आणला होता. त्यानंतर 29 वर्षांनंतर व्यवसायवाढीसाठी कंपनीने पुन्हा आपले शेअर्स एफपीओच्या माध्यमातून 25 जानेवारीला विक्रीला काढले. मात्र, हिंडेनबर्गने 24 जानेवारीला आपला अहवाल सोशल मीडियावर जारी केल्यामुळे अदानी समूहाचे शेअर्स पहिल्याच दिवशी 28 टक्क्यांनी आपटले, तर एफपीओमध्ये केवळ 1 टक्के गुंतवणूक झाली.