अदानी समूहाच्या शेअर व्यवहारांविषयी स्फोटक अहवाल प्रसिद्ध करणारी हिंडेनबर्ग रिसर्च संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास एलन मस्क यांचा मालकीहक्क असणाऱ्या एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने चार शब्दांची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील आणखी एका कंपनी किंवा समूहाबाबत हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेकडून मोठा गौप्यस्फोट होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता असून आतापासूनच गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे.
Hindenburg Research संस्थेने ‘हिंदुस्थानमध्ये काहीतरी मोठे घडणार आहे’, (Something big soon India) असे ट्विट शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास केले. अवघ्या काही तासांमध्ये हे ट्विट व्हायरल झाले असून जवळपास 2 मिलियन लोकांपर्यंत पोहोचले. हजारो लोकांनी हे ट्विट शेअर केले सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा सुरू आहे.
अर्थात नक्की काय मोठे घडणार आहे याबाबत हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने खुलासा केलेला नाही. मात्र हिंडेनबर्ग रिसर्च संस्था हिंदुस्थानच्या एखाद्या कंपनीबाबत किंवू समूबाबत पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Something big soon India
— Hindenburg Research (@HindenburgRes) August 10, 2024
गतवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अदानी समूहाच्या शेअर व्यवहारांविषयी स्फोटक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली होती. अदानी समूहाच्या शेअर्सला लोअर सर्किट लागले होते. तसेच विदेशात लिस्टेड असणाऱ्या बॉण्ड्समध्येही विक्रीचा सपाटा सुरू झाला होता. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये अदानी समूहाच्या संपत्तीत 86 अब्ज डॉलरची घट झाली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये गेले. अर्थात तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ झाली, मात्र ते पूर्वीच्या स्थरापर्यंत अजूनही पोहोचलेले नाहीत.