सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात उफाळलेला हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाहीये. आंदोलकांनी आता तेथील हिंदूंना लक्ष्य केले आहे. हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. जमावाकडून बांगलादेशातील हिंदूंची घरे आणि मंदिरे जाळण्यात येत आहेत. यामुळे बांगलादेशातील हिंदू नागरिक हिंदुस्थानात येण्याच्या उद्देशाने हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर असलेल्या कूचबिहार जिल्ह्यात एकत्र जमले आहेत.
हिंदुस्थान-बांगलादेश सीमेपासून 400 मीटर अंतरावर असलेल्या गायबांडा जिल्ह्यातील गेंडुगुरी आणि डायखवा गावात शुक्रवार सकाळपासून हे लोक एकत्र आले आहेत. हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील परिस्थिती पाहता बीएसएफच्या 157 बटालियनचे जवान या भागात तैनात करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, कूचबिहारमध्ये, शीतलकुचीच्या पठांटुली गावात हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा कुंपणाजवळ बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सीमेवर सतत गस्त सुरू आहे. बीएसएफचे जवान चोख बंदोबस्त ठेवत आहेत.
View this post on Instagram
सीमेवरील सुरक्षेसाठी सरकारकडून समिती स्थापन
बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली. ही समिती बांहलादेशातील हिंदुस्थानी नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्यांक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी बांगलादेशातील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी समन्वय राखेल.
एडीजी, सीमा सुरक्षा दल, पूर्व कमांड यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. समितीच्या इतर सदस्यांमध्ये इन्स्पेक्टर जनरल (IG), BSF फ्रंटियर हेडक्वार्टर दक्षिण बंगाल, इन्स्पेक्टर जनरल (IG), BSF फ्रंटियर हेडक्वार्टर त्रिपुरा, सदस्य (प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट), लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (LPAI) आणि सचिव, LPAI यांचा समावेश आहे.
जलपाईगुडी येथे बांग्लादेशी हिंदूचा घुसखोरीचा प्रयत्न
याआधी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर 1 हजारांहून अधिक बांगलादेशी हिंदू हिंदुस्थानात घुसण्याच्या उद्देशाने दाखल झाले होते. मात्र बीएसएफने हिंदुस्थानात घुसखोरीचे प्रयत्न रोखले आहेत. बीएसएफने या नागरिकांना सातकुरा सीमेवरच रोखले आहे. या परिसरात बीएसएफने तात्पुरते कुंपण घातले असून गस्तही वाढवली आहे. बीजीबीसह बीएसएफने नागरिकांची समजूत काढल्यानंतर सर्वजण माघारी परतले.