हिंदूबहुल गावातील एकमेव मुस्लिम उमेदवार सरपंच बनला

हिंदू-मुसलमान एकतेचे धागे अधिक बळकट करणारी एक घटना अयोध्येतील राजापूर गावात घडली आहे. हिंदू बहुल गावात एकमेव सरपंचपदासाठी उभा असलेला एकमेव मुसलमान उमेदवार निवडून आला आहे. विशेष बाब ही आहे की या तरुणाची चांगल्या मताधिक्याने निवड झाली आहे. हाफीज अझीमुद्दीन असं या तरुणाचं नाव आहे. बहुसंख्य समाजातील उमेदवारांना धोबीपछाड देत हाफीजने हा विजय मिळवला असून हे माझ्यासाठी ईदला मिळालेलं सर्वात मोठं बक्षिस असल्याचं त्याने म्हटलं आहे.

राजापूर गाव हे अयोध्येतील रुदौली मतदारसंघात आहे. या गावच्या सरपंचपदासाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. एकूण 600 मतांपैकी हाफीजच्या पारड्यात 200 मते पडली. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल हाफीजने गावकऱ्यांचे आभार मानले आहेत.

हाफीजच्या निवडीबाबत गावकऱ्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यातल्या गिरीश रावत यांनी सांगितलं की धार्मिक सलोख्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आम्ही धर्माच्या आधारावर मतदान केलं नसून, गावच्या भल्यासाठी काय चांगलं आहे याचा विचार करून मतदान केलं असल्याचं रावत यांनी म्हटलं आहे. आम्ही कट्टर हिंदू असूनही मुसलमान व्यक्तीला सरपंचपदी निवड केली, यावरून आम्ही किती धर्मनिरपेक्ष आहोत हे दिसतं असं शेखर साहू नावाच्या एका गावकऱ्याने म्हटलं आहे. अनेक अडथळे, संकटानंतरही या देशात धार्मिक सलोखा टीकून असल्याचं या घटनेवरून दिसून येतं असं अयोध्या मशिद ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी म्हटलं आहे.

विजयी उमेदवार हाफीजला मिळालेल्या 200 मतांपैकी फारतर 27 मते ही मुस्लमानांची असतील, बाकी सगळी मते ही हिंदू मतदारांची आहेत. हाफीज हा पेशाने शेतकरी असून तो मदरशात मुलांना शिकवण्याचेही काम करतो. हाफीजच्या कुटुंबाची जवळपास 20 एकर जमीन आहे ज्यात ते डाळी, फळं, भाज्यांचं उत्पादन घेतात.

आपली प्रतिक्रिया द्या