ज्याला राखी बांधली त्याने जबरदस्ती ‘निकाह’ केला, पाकिस्तानातील हिंदू तरुणीही हादरवणारी कहाणी

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या हिंदू तरुणीला तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आई-वडिलांच्या कुशीत शिरताच रिना मेघवार नावाच्या या तरुणी अश्रू अनावर झाले होते. थोडं सावरल्यानंतर तिला काय यातना सहन कराव्या लागल्या हे तिने तपशीलवार सांगितले. कासिम काशखेली नावाचा एक तरुण रिनाच्या शेजारी राहात होता. रिनाने त्याला राखी बांधून मानलेल्या भावासारखं वागायला सुरुवात केली होती. मात्र कासिमच्या डोक्यात भलतंच काहीतरी चालत होतं.

कासिमची रिनावर वाईट नजर होती. एकेदिवशी कासिमने रिनाचं अपहरण केलं आणि तिच्यासोबत निकाह केला. या सगळ्या प्रकारानंतर रिनाने एक व्हिडीओ चित्रीत केला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रिनाने म्हटलं होतं की ‘मला माझ्या आई-वडिलांकडे परत पाठवा. मला इथे जबरदस्ती आणण्यात आलं आहे. माझ्या वडिलांना आणि भावांना ठार मारेन असं म्हणत मला धमकावलं जातंय.’

या व्हिडीओमध्ये रिनाने कोणाचं नाव घेतलं नव्हतं. व्हिडीओ व्हायरल झाल्याने सिंध प्रांताच्या पोलिसांनी दखल घेत तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी एक विशेष पथक स्थापन करत रिनाची सुटका केली होती. रिनाला जेव्हा न्यायालयात आणण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की तिने इस्लाम स्वीकार केलेला नसून खोटी कागदपत्रे बनवत कासिमने आपल्यासोबत निकाह केला आहे. रिनाचं म्हणणं सविस्तर पद्धतीने ऐकल्यानंतर न्यायालयाने कासिमविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या