संघ परिवाराच्या कार्यकर्त्याने केली ताजमहालात शिवपूजा

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असलेल्या प्रसिद्ध ताजमहाल या वास्तूत विजयादशमीनिमित्त एका व्यक्तिने शिवपूजा केल्याचं वृत्त आहे. या माणूस संघ परिवारातील एका संघटनेचा कार्यकर्ता आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, हा कार्यकर्ता हिंदू जागरण मंच या संघटनेचा आहे. 25 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमित्ताने या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यांसोबत भगवा झेंडा घेऊन ताजमहाल परिसरात प्रवेश केला. तिथे बसून त्याने शिवपूजाही केली.

या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. त्यात एक माणूस ताजमहालासमोरील बाकड्यावर बसला आहे, दुसरा माणूस झेंडा घेऊन त्याच्या बाजूला उभा आहे, तर तिसरा या सगळ्याचं चित्रीकरण करत असल्याचं दिसून येत आहे.

या प्रकरणी हिंदू जागरण मंचाच्या आग्रा येथील अध्यक्ष गौरव ठाकूर याच्याशी माध्यमांनी संवाद साधला. तेव्हा त्याने ताजमहाल हे खरंतर तेजोमहल असल्याचं सांगितलं. तेजोमहल हे एक शिवमंदिर होतं. मी गेली काही वर्षं इथे कमीतकमी पाच वेळा शिवपूजा केली आहे. जोपर्यंत सरकार या स्मारकाला हिंदूंकडे सोपवत नाही, तोपर्यंत ही पूजा सुरू राहील, असं ठाकूर याचं म्हणणं आहे.

वास्तविक ताजमहाल परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव झेंडे, अगरबत्ती इत्यादी वस्तू नेण्यास मनाई आहे. त्यामुळे या प्रकरणी एका इंग्रजी दैनिकाने आग्र्याचे अपर मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांना कारवाईसंबंधित प्रश्नही विचारले. मात्र, त्याला उत्तर देण्यात आलं नाही. दरम्यान या प्रकरणी भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही व्यक्तिने या प्रकरणाबाबत खुलासा केलेला नसल्याचं वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या