‘गोडसेंची मूर्ती हटवाल तर गांधींची मूर्ती सुरक्षित राहणार नाही’

29

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मध्य प्रदेशमध्ये महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांचे मंदीर बांधल्यानंतर हिंदु महासभा आणि काँग्रेसमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. काँग्रेसकडून गोडसे यांचा पुतळा हटवण्याची मागणी होत असतानाच हिंदु महासभेने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नथुराम गोडसे यांचा पुतळा हटवला तर महात्मा गांधी यांचेही पुतळे जागेवर राहणार नाही असे वक्तव्य हिंदु महासभेने केल्याने हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.

ग्वाल्हेरमध्ये हिंदु महासभेने नथुराम गोडसे यांचे मंदीर उभारले आहे. त्याविरोधात काँग्रेस मैदानात उतरली असून ठिकठिकाणी विरोध सुरू आहे. ज्या लोकांनी महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचे मंदीर उभारले त्या सर्वांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दोन दिवसांत गोडसे यांची मूर्ती हटवली नाही तर मूर्ती फोडण्यात येईल अशी धमकी काँग्रेसने दिली आहे.

काँग्रेसच्या धमकीनंतर हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी मंदीर उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जमिनीची मागणी करण्यात आली होती, असे सांगितले. ‘आम्ही ९ नोव्हेंबरला जिल्हा प्रशासनाकडे नथुराम गोडसे यांचे मंदीर उभारण्यासाठी जमिनीची मागणी केली होती. प्रशासनाने नकार दिल्याने आम्ही ग्वाल्हेरमधील दौलतगंज भागातील आमच्या कार्यालयात गोडसेंचे मंदीर उभारले आहे; असे जयवीर भारद्वाज यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या