काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचारासाठी विश्वस्तांवर गुन्हे दाखल करा!

24

सामना ऑनलाईन । मुंबई

सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास समितीच्या विश्वस्तांनी २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांमध्ये न्यासाच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. गरज नसतानाही प्रवास खर्चावर अवाच्या सवा खर्च करून बेकायदेशीरपणे त्याची बिले वसूल केली आहेत. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे केली आहे.

सिद्धिविनायक मंदिर न्यासकडून २०१५-२०१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान, शासकीय रुग्णालयांना डायलेसीस मशीन पुरवणे अशा विविध सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यानुसार मदतीचा धनादेश देण्याबरोबरच कामाची पाहणी करण्यासाठी न्यासाचे तत्कालीन विश्वस्त प्रवीण नाईक आणि हरीश सणस यांच्यासह अन्य सदस्यांनी विविध ठिकाणी दौरे केले असून त्यावर तब्बल १२ लाख ९१ हजार रुपये एवढा मोठा खर्च करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रवास खर्च, लॉजिंग व बोर्डिंग चार्जेस, खानपान खर्चाचा समावेश आहे. मात्र सामाजिक कार्यासाठी न्यासाने केलेल्या अर्थसहाय्यासाठी न्यासाचे अध्यक्ष व सदस्यांनी दौरे करण्याची तरतूद अधिनियमांमध्ये नाही, तसेच असा खर्च करण्यासाठी सरकारकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवीण नाईक आणि हरीश सणस यांनी न्यासाच्या पैशाने कसे काय दौरे केले, असा सवाल परिषदेने केला आहे.

लेखापरीक्षकांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह
विश्वस्तांनी न्यासाच्या पैशाची जी उधळपट्टी केली आहे, ती बाब विधी व न्याय विभागाच्या तपासणीत संबंधित अधिकाऱयांच्या लक्षात आली आहे. मग प्रत्येक वर्षी न्यासाचे लेखापरीक्षण करणाऱया सनदी लेखापरीक्षकांच्या लक्षात ही बाब का आली नाही, की त्यांनी जाणीवपूर्वक लपवली याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच शासनाने नेमलेले लेखा परीक्षक विकले जात असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रवीण नाईक या विश्वस्तांनी मिरज येथील कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी चार दिवसांचा दौरा केला होता. त्यानुसार त्यांनी दिलेल्या पेट्रोल आणि हॉटेलच्या खर्चाच्या बिलांचा मेळ लागत नाही. यावरून दौऱ्याच्या माध्यमातून विश्वस्त न्यासाची आर्थिक लूट करत असल्याचे दिसत आहे.
-वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषद

आपली प्रतिक्रिया द्या