हिंदू महिलेने मुलाचा बाप्तिस्मा केला, पोलिसात तक्रार दाखल

1387

एक हिंदू महिलेने मुलाचा धर्म बदलून ख्रिस्ती धर्म केल्याने अहमदाबाद येथे तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय मुलाचा धर्म बदलल्याने ही तक्रार दाखल झाल्याचं वृत्त आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मंजुळा प्रदीप असं या महिलेचं नाव आहे. 8 एप्रिल 2012 रोजी मंजुळा यांनी आणंद येथील चर्च गाठले आणि तेथील पाद्र्यांना मुलाचा बाप्तिस्मा करण्याची विनंती केली होती. मंजुळा या घटस्फोटिता आहेत. 2001मध्ये त्यांचा विवाह झाला होता तर 2008मध्ये त्या पतीपासून विभक्त झाल्या. 2012मध्ये मुलाचा बाप्तिस्मा केल्याचं कळताच मंजुळा यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीने 2013मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून या धर्मांतरणाला आव्हान दिलं होतं. पण, त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

त्यामुळे आणंद येथील स्वयंसेवी कार्यकर्ते धर्मेंद्र राठोड यांनी 2013मध्ये या प्रकरणी याचिका दाखल केली होती. मंजुळा यांनी आपल्या विभक्त पतीच्या सहमतीशिवाय मुलाचं धर्मांतरण केलं आहे. हे 2003मधील गुजरात धर्मस्वातंत्र्य कायद्याचं उल्लंघन असल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे. हा कायदा जबरदस्तीने, आमीष दाखवून किंवा चुकीच्या हेतूंनी कुठल्याही व्यक्तिचं धर्मांतरण रोखण्यासाठी अस्तित्वात आला आहे. त्यानुसार मंजुळा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही चौकशी सुमारे सहा वर्षं प्रलंबित होती. त्यानंतर आणंदचे जिल्हाधिकारी आर. जी. गोहिल यांनी मंजुळा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

दुसरीकडे, मंजुळा यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोणतंही मूल त्याचा किंवा तिचा धर्म काय हे ठरवू शकत नाही. ते मूल त्याच्या आईवडिलांचा धर्म स्वीकारतं. जसं याही प्रकरणात आहे. मूल सज्ञान झाल्यानंतर त्याला हवा तो धर्म स्वीकारू शकतं. त्यामुळे एका आईने तिच्या मुलाचा बाप्तिस्मा केला म्हणून अशा प्रकारे पोलीस तक्रार करण्यात काहीही तथ्य नसल्याचं मंजुळा यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या