बुरखा घालण्यास नकार दिला, मुस्लीम तरुणाने हिंदू पत्नीचा गळा चिरला

बुरखा घालण्यास नकार देणाऱ्या 23 वर्षांच्या हिंदू तरुणीची तिच्या नवऱ्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना मुंबईत टिळक नगर येथे घडली आहे. रुपाली असं या तरुणीचं नाव असून तिच्या नवऱ्याचं नाव मोहम्मद इक्बाल शेख असं आहे.

रुपाली आणि मोहम्मदने तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे. मोहम्मद आणि त्याचं कुटुंब तिला बुरखा घालण्याची सक्ती करत होता. पण, ती नेहमी याला नकार देत असे. त्यावरून त्यांच्यात वरचेवर वाद होत होते. त्यामुळे ती मोहम्मदला सोडून वेगळं राहू लागली होती. ते दोघंही फक्त फोनवरून संपर्कात होते.

सोमवारी मोहम्मद इक्बालने तिला फोन करून भेटायला बोलवलं. तेव्हा त्यांच्यात पुन्हा बुरख्यावरूनच वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या मोहम्मदने चाकूने रुपालीचा गळा चिरला. त्यामुळे रुपालीचा जागीच मृत्यू झाला. मृत्युपूर्वी रुपालीने केलेल्या ओरड्यामुळे तिथे लोक जमा झाले. जमलेल्या लोकांमुळे मोहम्मद घाबरला आणि तिथून पळून गेला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुपालीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि काही वेळातच मोहम्मदला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहम्मदने सांगितलं की, हे त्याचं दुसरं लग्न होतं. त्याचं यापूर्वीही लग्न झालं होतं. पण, पहिल्या पत्नीला मूल नसल्याने त्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याने रुपाली या हिंदू तरुणीशी विवाह केला. पण, काही काळापूर्वी रुपाली आणि त्याच्यात वाद झाल्याने ती वेगळी राहू लागली. तो तिला मनवायलाच गेला होता, असं त्याने पोलिसांना सांगितलं. मात्र, आपल्या बहिणीवर बुरख्याची सक्ती केली जात होती, त्याला नकार दिल्यानेच तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप रुपालीच्या बहिणीने केला आहे.