
देशात सध्या वाढत असणाऱ्या धर्मांधतेचे सत्य आता पोलीस अधिकारीही स्वीकारू लागले आहेत. देशातील काही हिंदुत्ववादी संघटनांवर या धर्मांधतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या परिषदेत, पोलिस अधिकाऱ्यांनी देशात वाढत्या कट्टरतावादासाठी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरले आहे.
20 ते 22 जानेवारी दरम्यान झालेल्या या पोलीस परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी बैठकीत सादर केलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती समोर आली आहे. ही माहिती काही काळ वेबसाइटवर होती, मात्र बुधवारी ती वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली.
एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या बैठकीत पीएफआय, दावते-इस्लामी, तौहीद, केरळ नदवातुल मुजाहिदीनवरही कट्टरतावादाचा ठपका ठेवण्यात आला आहे.