आमदारांसाठी पायघड्या; शेतकरी थंडीत रस्त्यावर

42

सामना प्रतिनिधी । हिंगोली

दोन आमदारांनी केलेले उपोषण सोडविण्यासाठी चर्चेच्या तीन वेळा पायघड्या घालणाऱ्या पोलीस प्रशासनाने दोन दिवसापासुन उपोषणाला बसलेल्या सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपोषणाकडे मात्र डोळेझाक केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची दखल जिल्हा प्रशासनाने शिवसेनेकडुन पाठींबा मिळाल्यावर घेतली.

आमदार संतोष टारफे व रामराव वडकुते यांच्या व्हीआयपी उपोषणाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी उपोषणापुर्वी दोन वेळा व प्रत्यक्षात उपोषण सुरू होताच दिड तासामध्ये उपोषणस्थळी जाऊन आमदारांशी चर्चा केली. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे चावरीया यांना भेटायला गेल्यावर सुत्रे हलली. त्याचवेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला सेनगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी चटई अंथरुन शामीयाना न टाकता उपोषण सुरु केले. उटी पुर्णा येथील गट नंबर ०२ व ०३ मधील शासन संपादीत नदी पात्रात पेरणी करण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे व अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाची दखल आज दुसऱ्या दिवशीही ना पोलीस प्रशासनाने घेतली, ना सत्ताधारी व मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी घेतली. आज दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरुच होते. एकाही पोलीस अधिकाऱयाने अजुन भेट देऊन साधी चर्चा केली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आज या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या