हिंगोली दंगल : पोलीस निरीक्षकासह अधिकाऱ्यांना अभय; कर्मचारी सुळावर

1298

पंधरा वर्षांपासून किरकोळ अपवाद वगळता सामाजिक एकता व शांतता अबाधित असलेल्या हिंगोली शहरात बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेच्या कावडयात्रेवर हल्ला चढवून धर्माध मुस्लीमांनी गालबोट लावले. मात्र, या दंगलीला जबाबदार कोण? असा प्रश्न समोर आला आहे. वातानुकूलीत कक्षाच्या बाहेर न पडता कारभार पाहणारे व जनसंवादात कमी असणारे पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या पहिल्या कारकिर्दीत दंगलीची नोंद झाली आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व ईतर पोलिसांना गुप्त हालचाली माहित झाल्या नसल्याचेही यामुळे समोर आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाठीचार्ज केल्याप्रकरणी निलंबीत केले असून मारा, ठोका, मागे फिरु नका असे आदेश देणाऱ्या पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना मात्र अभय देत उफरटा न्याय केला आहे.

दरम्यान, काही मुठभर धर्मांधामुळे हिंदु-मुस्लीम एकतेला तडा गेल्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांची कार्यपध्दती व जनसामान्यासोबत  असलेला थेट संपर्क याची शेकडो हिंगोलीकरांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकारांसमोर उजळणी केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे मागिल काही वर्षापासून श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कावडयात्रा काढतात. यंदाच्या वर्षी दुसऱ्या श्रावण सोमवारीच मुस्लीमांचा बकरी ईद हा सण देखील  आला. ईदगाहवर नमाजासाठी मुस्लीमांची होणारी गर्दी व कावडयात्रेला शिवसैनिकांसह शिवभक्तांची होणारी गर्दी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय व हिंगोली शहर पोलीस ठाण्याकडून योग्य पोलीस बंदोबस्त ठेवत चोख नियोजन करणे अपेक्षीत असल्याचे मत अनेकांनी नोंदविले. पोलीस अधीक्षकांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी ईदगाहवर नमाजनंतर शुभेच्छा देण्यासाठी  हजर असतात. मात्र, पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी या प्रकाराला फाटा दिल्याचे बोलले जाते.

नॉन करप्ट पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी अति कार्यतत्पर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याकडे शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार बहाल केला आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी ईदगाहवर किती कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला होता, कर्मचारी कमी असतील तर मुख्यालयातुन अतिरिक्त बंदोबस्त मागवला होता का?  पोलीस अधीक्षक व शहराचे पोलीस निरीक्षक ईदगाहवर स्वत: हजर होते का ? ज्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले त्यांना केलेले कर्तव्य पार पाडण्याचे आदेश कुणी दिले? असे प्रश्न समोर आले आहेत.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल हे दोन दिवसापासून हिंगोलीत तळ ठोकून आहेत. तीन पोलीस कर्मचाऱ्यांना आयजींच्या आदेशानेच निलंबीत करण्यात आले. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिषण दंगल उसळली, धर्मांध समाजकंटकांनी हैदोस घातला, त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर आयजीपी मुत्याल हे कार्यवाही करणार की अर्थपूर्ण दुर्लक्ष करणार याकडे लक्ष लागुन असल्याचे काहींनी बोलुन दाखविले. पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांना अभय तर कर्मचाऱ्यांना सुळावर अशी उफरटी कार्यवाही आयजीपींनी केल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त झाल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, शिस्त व कारवाईचा बडगा असल्याने उघडपणे बोलण्यास पोलीस कर्मचारी धजावले नाहीत. तथापि, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेली निलंबनाची कार्यवाही अन्यायकारक असून ही कार्यवाही मागे घेऊन त्यांना परत सेवेत घ्यावे, अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या