हिरकणीची किमया

72

<<   प्रेरणा >>        <<  अरुण नलावडे >>

आयुष्याचे क्षिताजाकडे जाणाऱ्या वयात मुलांचे संगोपन, त्यांची करिअर घडवण्याचे व संपूर्ण कुटुंबाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेत, आपल्या घरकुला आधार देत आधारवड होण्यासाठी सध्याची महिला पुरुषांपेक्षा जास्त धडपड करीत असते. त्यातही आर्थिक स्थिती बेताची असल्यास कुटुंब चालवण्यासाठी चूल आणि मूल हे गणित महिलेच्या जीवनातील अविभाज्य घटकच बनून राहते. या बोज्याखाली महिला स्वतŠचे आरोग्यच नव्हे तर आपल्या आशा, आकांक्षा बाजूला ठेवते आणि प्रपंचाला वेळ देणे हेच कर्त्यव्य समजते. मग ती अशिक्षित ग्रामीण भागातील असो किंवा उच्च शिक्षित वा अगदी आयएएस दर्जाची अधिकारी असो. परंतु या चक्राची जबाबदारी सांभाळत भूतकाळातील आपले खेळाडू मन व वृत्ती जागवण्याची किमया रायगडातील हिरकणी, ज्योतिका पाटेकर यांनी केली आहे.

शालेय व महाविद्यालयीन जीवनात म्हणजे १९८४ ते १९९० मध्ये उत्कृष्ट पॉवर लिफ्टिंग असणाऱया ज्योतिका यांनी लग्नानंतर म्हणजे तबल २६ वर्षांनी या क्षेत्रात अगदी अनपेक्षित प्रसंगाद्वारे पुनरागमन क्केले आहे. हे पुनरागमनही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी निर्माण करत दणदणीतपणे केले आहे. कोइम्बतूर येथे होणाऱया राष्ट्रीय पॉवर स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. याबाबत ज्योतिका सांगतात, मुलीला पॉवर लिफ्टिंगची आवड आहेच. मुंबईत दादर येथे तिच्या स्पर्धेच्या निमित्ताने जाणे झाले आणि या क्षेत्रात येण्याची आवड निर्माण झाली. त्यासाठी येथील क्रीडा शिक्षकांना विचारले आणि त्यानींही कोणतेही आढेवेढे न घेता प्रशिक्षण देण्याचे मान्य केले. आम्ही मायलेकी सरावासाठी गोरेगावच्या व्यायाम शाळेत जाऊ लागल्.

ज्योतिका यांनी क्रीडा क्षेत्रात आगमन केले. तेव्हा सुरुवात जिम्नॅस्टिक्स शिकण्यापासून झाली. त्यात अनेक पदके मिळवून नावही  गाजवले. मुलगी वैभवी बरोबर सराव करताना ज्योतिका यांनी पॉवर लिफ्टिंगच्या तीन महिन्याच्या सराव कालावधीत जिल्हा स्तरीय क्रिडास्पर्धेत पहिली येण्याचा मान मिळवला आहे. याचबरोबर जळगाव येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकही मिळवले आहे. यावेळी ज्योतिका यांनी ६३  किलो वजनी गटात २०७ किलोचे वजन उचलले होते. ज्योतिका यांनी शैक्षणिक जीवनात लग्नापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत ५ वेळा सहभाग घेतला असून या वर्षी १२ ते १५ जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघात त्यांची निवड झाली आहे. भविष्यात कठीण परिश्रम व जिद्द ठेवत जागतिक दर्जाच्या ऑलीम्पिक स्पर्धेत उतरून देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची ज्योतिका यांची इच्छा आहे.

खेळामध्ये प्राविण्य मिळवत रायगडकरांची मान उंचावणाऱया ज्योतिका पाटेकर या रायगडातील गोरेगावसारख्या छोटय़ाशा गावात स्वतŠचा व्यवसाय चालवतात. घरातील आर्थिक स्थिती बेताची असल्याने हातगाडीवर सँडविच, स्नॅक्स विकून त्या संसाराला हातभार लावतात. ज्योतिकाताईंचं कुटुंबही मोठं आहे. या कुटुंबाचं पालनपोषण करताना पॉवर लिफ्टिंगचं स्वप्नही त्यांना पूर्ण करायचं आहे. यात त्यांना त्यांची मुलं मदत करत आहेत. मात्र वाढते वय, वजन व आरोग्य यावर मात करण्याची किमया रायगडातील या हिरकणीने दाखवली आहे. मात्र् या मर्यादा असल्या तरी संसाराच्या जोखडातून आपल्या क्रीडा गुणांना वाव देत ज्योतिकांचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

मुलांची व कुटुंबाची जबादारी घेत आपल्या आशा आकांक्षा जपण्याची कुवत आई रिटायर होतेय… या वयातही ज्योतिका पाटेकर यांनी मोठय़ा हिमतीने दाखविली आहे. कर्तव्याच्या ओझ्याखाली न दबता जिद्द, ध्येय व मेहनत यांच्या जोरावर पॉवर वूमन म्हणून नावारूपास येण्याची लीला ज्योतिका पाटेकर यांनी केली आहे. ज्योतिका आणि वैभवी या मायलेकींची कहाणी आजच्या समस्त महिला वर्गापुढे आदर्शवत अशीच आहे.

मुलीला खेळाडू बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱया कथा दंगलसारख्या सिनेमातून मांडल्या जातात. रायगडात मात्र दोघी मायलेकीच यासाठी सरसावल्या आहेत. रायगडच्या या हिरकणीचा आपल्याला गर्व असायला हवा.

 

आपली प्रतिक्रिया द्या