देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिला रायडरचा अपघाती मृत्यू, मोटारसायकल स्लीप झाली अन्…

सातारा येथून राज्यातील साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी मोटारसायकलवरून निघालेल्या हिरकणी रायडर्स ग्रुपच्या एका महिला रायडर्सचा नांदेड जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी नऊ वाजता ही दुर्देवी घटना घडली.

सातारा येथील हिरकणीबाई रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवार, मनीषा फरांदे, मोना निकम जगताप, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनर्जी, ऊर्मिला भोजने व अंजली शिंदे या महिला रायडर्स मोटारसायकलवरून साडेतीन शक्तिपीठाच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. कोल्हापूर, तुळजापूर येथे दर्शन घेऊन हा काफिला नांदेडला आला.

आज सकाळी या महिला रायडर्सनी सचखंड गुरूद्वाराचे दर्शन घेतले. त्यानंतर हा काफिला माहुरगडाकडे मार्गस्थ झाला. भोकर फाट्याजवळ पुलाचे काम सुरू आहे. शुभांगी पवार यांची मोटारसायकल या ठिकाणी स्लीप झाली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या टँकरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असतानासुद्धा टँकरचा वेग जास्त असल्याने त्या चिरडल्या गेल्या. या घटनेची माहिती मिळताच महामार्गाचे प्रभारी ज्ञानेश्वर बसवंते व चौरे, काकडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून अर्धापूर येथे नेला.

दहा जिल्हे, 124 तालुक्यांची मोहीम

नवरात्र महोत्सवानिमित्त सातारच्या हिरकणीबाई रायडर्स ग्रुपने साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्याची मोहीम आखली होती. याअंतर्गत एक हजार 168 किलोमीटरचा प्रवास त्या करणार होत्या. या कामगिरीची नोंद इंडिया ग्रुप ऑफ रेकॉर्डमध्ये होणार होती. 10 ऑक्टोबर रोजी या रायडर्स ग्रुपच्या सदस्यांनी मोटारसायकलवर जाऊन कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या माहूरच्या शक्तिपीठाकडे नांदेडमार्गे निघाल्या होत्या. सहा दिवसांत सातारा, कोल्हापूर, तुळजापूर, नांदेड, माहूर, संभाजीनगर, नाशिक व वणी असे दहा जिल्हे व 24 तालुके असा एक हजार 168 किलोमीटरचा प्रवास त्या करणार होत्या. या मोहिमेंतर्गत महिलांचे सक्षमीकरण, स्तनांचा कर्करोग, रस्ते वाहतूक सुरक्षा अशा विविध प्रश्नांवर समाजजागृती त्या करणार होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या