माउंट एव्हरेस्टवरील ‘तो’ ऐतिहासिक कडा कोसळला

  • सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगातील सर्वात उंच आणि अतिदुर्गम पर्वतशिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवरील ऐतिहासिक कडा कोसळला आहे. ‘हिलरी स्टेप’ या नावाने प्रसिद्ध असलेला ऐतिहासिक कडा कोसळला आहे. एका ब्रिटीश गिर्यारोहकाने या बातमीला दुजोरा दिला आहे. हा कडा कोसळल्यानंतर एव्हरेस्टवर चढणे पहिल्यापेक्षा अवघड आणि धोकादायक झाले आहे. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या प्रलयकारी भूकंपानंतर हा कडा कोसळल्याचे बोलले जात आहे. नेपाळमधील त्या भूकंपानंतर गिर्यारोहकांना एव्हरेस्टवर चढाई करण्यास काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती.

ब्रिटीश गिर्यारोहक टीम मूजडेल याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर ‘हिलरी स्टेप’ कोसळल्याची फोटो पोस्ट करत हा कडा कोसळल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. याबाबत टीमने लिहिले आहे की, ‘हो हे खरे आहे. आता तो ऐतिहासिक कडा अस्तित्वात नाही. पुढे काय होईल हे आता माहित नाही, मात्र एव्हरेस्टवर चढणे आता पहिल्यापेक्षा अवघड झाले आहे’. टीमने एकूण ६ वेळा एव्हरेस्ट पर्वतशिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे. याचवर्षी १६ मे रोजी सहाव्यांदा तो एव्हरेस्टवर गेला होता. तेव्हा ‘हिलरी स्टेप’ कोसळल्याचे लक्षात आले.

माउंट एव्हरेस्ट या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली होती. एडमंड हिलरी यांच्या नावावरून एव्हरेस्टवरील त्या कड्याला ‘हिलरी स्टेप’ असे नाव देण्यात आले होते.

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वत रांगेतील या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून, ते नेपाळ आणि चीन (तिबेट) या देशांच्या सीमेजवळ आहे.