१८६ वर्ष जुना मुंबई-पुणे मार्गावरील ऐतिहासिक पूल पाडणार

297

सामना प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसाठी अडसर ठरणारा खंडाळा-बोरघाटातील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने थेट जनतेमधून सूचना व हरकती मागविल्या असून येत्या २४ जुलैपर्यंत त्याकरिता कालावधी दिला आहे.

पुण्यातील सुधीर थत्ते गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) पाठपुरावा करीत होते. अखेर पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा घाटातील ब्रिटिशकालीन १८६ वर्षे जुना अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ने घेतला आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी सदरचा पुल हा रेल्वेच्या ताब्यात असल्याने याबाबत रेल्वे प्रशासनाशी देखील पत्रव्यावहार करण्यात आला असून नागरिकांच्या याबाबत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सूचना व हरकतीनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पुलाखाली अवजड वाहने अडकून होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे.

थत्ते यांनी २२ जून २०१५ रोजी ‘एमएसआरडीसी’ला पत्र पाठवून तेथील सद्यस्थिती कळविली होती; तसेच वाहतुकीची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी यामध्ये काही उपाय सांगितले होते. अमृतांजन पूल हा पूल ५०० मीटरचा आहे. यातील १०० मीटरचा भाग तोडला, तरी द्रुतगती मार्गावरील वाहतुकीची परिस्थिती सुधारणार आहे. यामुळे वेळेची बचत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल, रस्त्याचा टिकाऊपणा वाढेल आणि मुख्य म्हणजे वाहतूक सुरळीत चालेल, असे थत्ते यांचे मत आहे. या पूलाजवळ असलेला ‘यू-टर्न’ भराव टाकून उंच केल्यास चढ आणि उतार एका पातळीवर येऊन वाहनचालकांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असेही ते म्हणाले. थत्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याबाबत पत्र पाठविले होते.

मुंबई-पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारे अंतर कमी व्हावे व ही शहरे जलदगतीने जोडली जावीत याकरिता द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र खंडाळा बोरघाटातील खोपोली ते खंडाळा परिसरात द्रुतगती महामार्ग बनवितांना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या परिसरात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग एकत्र आले. त्यातच घाट क्षेत्रातील चढण व उतारामुळे या परिसरात अपघात व वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

द्रुतगतीवर दुतर्फा असलेल्या मार्गीकांपैकी सर्वात शेवटची लाईन ही अवजड वाहनांसाठी, मधली लेन ही हलक्या वाहनांसाठी आणि कॉरिडोरच्या लगतची लेन ही ओव्हर टेकिंगसाठी असा नियम असताना अमृतांजन पुलाखालील अरुंद जागेमुळे या ठिकाणी नियमांला छेद देत शेवटची लेन हलक्या वाहनांसाठी व मधली लेन अवजड वाहनांसाठी असे फलक लावलेले असल्याने याठिकाणी लेन कटिंगची समस्या मोठी आहे. त्यातच याठिकाणी मुंबईकडे जाणार्‍या अवजड वाहनांना उतारावर वळण घेताना अडचण येत असल्याने वाहने उलटून आजवर येथे अनेक अपघात झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या