वाकाटकांची राजमुद्रा नागपूर संग्रहालयाकडे सूपूर्द ; इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणी

667

वाकाटक वंशातील शेवटचा राजा द्वितीय पृथ्वीषेण यांची राजमुद्रा गोजोली येथील उराडे परिवाराकडे सापडली. ही ऐतिहासिक ठेवा सर्वांना बघता यावी यासाठी उराडे परिवाराने नागपूर मध्यवर्ती संग्रालयाकडे ही राजमुद्रा दिली आहे. लवकरच ही राजमुद्रा नागपूर मध्यवर्ती संग्रालयात सर्वांना बघता येणार आहे. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गोजोली येथील प्रकाश उराडे यांनी राजमुद्रेचे जतन करून ठेवले होते. प्रकाश उराडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रंजित उराडे याने वडिलांचे संदूक उघडले असता, त्यात ही राजमुद्रा आढळून आली. या राजमुद्रेवर बोधीसत्व तारा यांचे चित्र अंकित असून ब्राम्ही लिपीतील चार ओळींचा लेख कोरलेला आहे.

राजमुद्रेचे वजन 60 ग्रॅम असून 7 सेमी लांब 3 सेमी रूंदीची ही मुद्रा आहे. रंजित उराडे यांनी ही राजमुद्रा इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांना दाखविली. झाडे यांनी राजमुद्रेचा खरा इतिहास उजेडात आणला. राजमुद्रा सापडल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले. नागपूरच्या संग्रहालयाच्या सहाय्यक संचालक जया वाहने यांनी भ्रमणध्वनीद्वारे उराडे परिवारांशी संपर्क साधला. तसेच त्यांना पत्र पाठवले. इतिहासाच्या दृष्टीने ही राजमुद्रा अनमोल असल्याचे त्यांना समजावले. जया वाहने यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उराडे परिवार संग्रहालयाला राजमुद्रा देण्यासाठी तयार झाला आहे. संग्रहालयाचे पथक राजमुद्रा घेण्यासाठी शुक्रवारी गावात आले होते. उराडे परिवाराने हा अनमोल ऐतिहासिक ठेवा त्यांच्याकडे सूपूर्द केला. आता राजमुद्रा नागपूरच्या संग्रहालयात ठेवली जाणार आहे. यावेळी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक विनायक निटूरकर, ऐतिहासिक वारसा संवर्धन समितिचे अरूण झगडकर, इतिहास अभ्यासक निलेश झाडे, आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या