मुंबईचा आश्चर्यकारक पुराणपुरुष

195

>> आसावरी जोशी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस… एका जागतिक सर्वेक्षणानुसार हे आपले मध्य रेल्वे स्थानक जगातील दुसऱया क्रमांकाचे आश्चर्यकारक रेल्वे स्थानक ठरले आहे… पाहुया त्याच्याशी संबंधित आश्चर्याच्या गोष्टी….

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दोन दिवसांपूर्वीच वाचनात आले की, एका जागतिक सर्वेक्षणानुसार हे आपले प्राचीन जागतिक वारसा असलेले मध्य रेल्वे स्थानक जगातील दुसऱया क्रमांकाचे आश्चर्यकारक रेल्वे स्थानक ठरले आहे. मनात विचार आला जेव्हा या रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवरायांच्या नावाचा परिसस्पर्श झाला तेव्हाच हे स्थानक अतुलनीय आश्चर्याच्या तेजाने झळाळून उठले. 20 मे 1888 सालापासून मुंबईतील, महाराष्ट्रातील, देशातील अनेक घडामोडी स्थित्यंतर खांदेपालट, सत्तापालट पहात, रिचवत, पचवत आपले हे मध्य रेल्वे स्थानक ठामपणे उभे आहे. त्याचा सगळा वारसा जरी इंग्रजांचा असला तरी शिवस्पर्शाने प्रेरीत होऊन मुंबईच्या मातीतले आणि खाऱया पाण्यातले अस्सल मराठीपण त्याने मनोमन जपले आहे. दररोज तीन दशलक्ष प्रवाशांचा हा प्रवासाचा.. वाट पाहण्याचा… थोडय़ा फार विसाव्याचा.. हक्काचा थांबा आहे. अनेक स्वप्नं उराशी घेऊन मुंबईकर सीएसएमटी ते पार कर्जत-कसाऱयापर्यंत ये-जा करतात. तिन्ही त्रिकाळची ही गर्दी हे स्थानक बिनतक्रार अंगावर वागवते. प्रचंड गर्दी आणि हरेक प्रकारची माणसं चांगली, वाईट, भलीबुरी ही प्रत्येक रेल्वे स्थानकाची ओळख. या वाईट-वानक्याच्या गर्दीत मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसने मात्र स्वतःचा चेहरा वेगळा ठेवलेला आहे. 132 वर्षांचे हे रेल्वे स्थानक. हरेक क्षणी काही तरी सांगत असते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असते. अक्षरशः असंख्य घटनांच्या कोलाजने मुंबईचा हा पुराणपुरुष उभा राहिला आहे. काय नाही त्याच्या व्यक्तिमत्त्वात… अनेक वर्षांच्या इतिहासाची निबीड गर्द किनार आहे. पारतंत्र्यात जन्मूनही त्याने असंख्य डोळय़ांनी आणि हजारो संवेदनशील मनांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिली. स्वातंत्र्याच्या तिन्ही रंगांत माखून निघताना तो अभिमानाने फुलून येतो. मुंबईकडे येणाऱ्या प्रत्येक पोटार्थीला मुंबईत थारा देतो निमुटपणे असह्य गर्दी मिटल्या तोंडाने सहन करीत. आजही ही गर्दी त्याला रोज काहीतरी नव्याने शिकवून जाते. हळूहळू थोडय़ा काळापुरती गर्दी ओसरते. स्थानक थोडे विसावते. आणि स्वतःच स्वतःशी बोलते होते. इतिहासाची.. असंख्य बऱया-वाईट घटनांची आठवण जागवत राहते स्वतःशीच… कारण धावणाऱया कोणाकडेच वेळ नसतो त्याची 132 वर्षांची चित्तरकथा ऐकायला..

मे 1878 मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन यांनी या कंपनीचे मुख्यालय बांधण्यास सुरुवात केली आणि 20 मे 1888 मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली. त्याकाळी ही इमारत बांधण्यासाठी 16.14 लाख रुपये खर्च आला.
या स्थानकाची रचना गॉथिक शैलीची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात दर्शनी भागात असलेल्या घडय़ाळाखाली राणीचा पुतळा होता. पुढे 1950 साली तो हटवण्यात आला.
मे 1878 मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन यांनी या कंपनीचे मुख्यालय बांधण्यास सुरुवात केली आणि 20 मे 1888 मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली. त्याकाळी ही इमारत बांधण्यासाठी 16.14 लाख रुपये खर्च आला.
या स्थानकाची रचना गॉथिक शैलीची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात दर्शनी भागात असलेल्या घडय़ाळाखाली राणीचा पुतळा होता. पुढे 1950 साली तो हटवण्यात आला.
आशियातील पहिल्या रेल्वेचा प्रवास 16 एप्रिल 1853 साली बोरीबंदर ते ठाणे असा झाला. या रेल्वेसाठी ग्रेट इंडियन पेनिन्सुला ही रेल्वे कंपनी स्थापन झाली. तिचे प्रथम कार्यालय मुंबईचे. आद्य शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या घरात होते.
या रेल्वे स्थानकात एकूण 18 फलाट असून सात फलाट उपनगरीय वाहतुकीसाठी असून उरलेले फलाट बाहेरगावच्या गाडय़ांसाठी आहेत.
आज या स्थानकातील प्रवाशांची संख्या तुलनेने घटली आहे असे येथील रेल्वे अधिकाऱयांचे सांगणे आहे.
ही इमारत पूर्व-पश्चिम बांधण्यात आली आहे. इंग्रजी ‘सी’ अक्षराप्रमाणे तिचा आकार आहे. या स्थानकाची रचना लंडनमधील सेंट पेकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे.
या स्थानकामध्येच रेल्वेचा इतिहास सांगणारे वस्तुसंग्रहालय आहे.
1887 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त इमारतीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस ठेवण्यात आले.
1996 साली शिवसेनेच्या पुढाकाराने स्थानकाचे नामकरण महाराजांच्या नावे करण्यात आले. 2017 सालापासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते.
अजमल कसाबचा हिंस्र चेहरा सर्वप्रथम सीएसएमटीनेच जगासमोर आणला.
स्लमडॉग मिलिएनिअर या चित्रपटातील गाणे याच स्थानकात चित्रित करण्यात आले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या