शक्ती-भक्तीचा अनोखा संगम साधणारी दुर्गाडी देवी

294

सामना ऑनलाईन, ठाणे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची मोठी परंपरा आहे. कल्याणच्या विस्तीर्ण खाडीकिनारी मोठय़ा दिमाखात उभा असलेला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असून या किल्ल्यावर दुर्गाडी देवी हे कल्याणचे मोठे वैभव मानले जाते. दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून ठाणे जिह्याच्या विविध भागांतून दुर्गाडी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होणार आहे. येथील नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती व शक्ती यांचा अनोखा संगम असून सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळे या उत्सवाला वेगळे अधिष्ठान प्राप्त झाले आहे. नऊ दिवस आकर्षक विद्युत रोषणाई, खडय़ा आवाजात होणारी आरती आणि भक्तांची  प्रचंड गर्दी असा माहोल नवरात्रोत्सवात अनुभवण्यास मिळणार आहे.

मान्यवर कलाकारांची उपस्थिती

दुर्गाडीवर १९६९ मध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असली तरी १९८४-८५ च्या दरम्यान त्याचे स्वरूप भव्यदिव्य होत गेले. नवरात्रोत्सवाच्या काळात भजन, कीर्तन, व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांसाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.  त्यात दादा कोंडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शाहीर साबळे,  विठ्ठल उमप आदी अनेक कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय दुर्गाडीच्या पायथ्याशी भरणारा मेळा हे अबालवृद्धांचे मोठे आकर्षण असून त्यात अनेकांना रोजगारही मिळतो.

शिवसेनाप्रमुखांनी केला श्रीगणेशा

दुर्गाडी किल्ल्यावर पूर्वी हिंदूंना धार्मिक कार्यक्रम करण्याची मनाई करण्यात येत होती. एवढेच नव्हे तर किल्ल्यावर हिंदूंना बंदीही घातली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा बंदी आदेश झुगारून १९६९ साली दुर्गाडी किल्ल्यावर कूच केले. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे व शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते देवीची मोठय़ा उत्साहात पूजा करण्यात आली. यावेळी गजानन महाराज पट्टेकर, शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे, माजी मंत्री साबीर शेख यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. १९६९ पासून दुर्गाडीवर नवरात्रोत्सव शिवसेनेने सुरू केला आणि आजतागायत हा उत्सव तेवढय़ाच जोमाने सुरू आहे.

मोगलांच्या ताब्यात असलेला दुर्गाडी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवला आणि या किल्ल्याचे स्वरूपच पालटून गेले. हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार कल्याणच्या खाडीवर उभारले होते. या किल्ल्यावरून विस्तीर्ण प्रदेश दिसायचा. त्यामुळे  स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने दुर्गाडीचे महत्त्व पूर्ण जसे होते तसेच अजूनही कायम आहे. किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे मंदिर म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोळी समाजातर्फे पूर्वी पूजाअर्चा केली जायची. अजूनही दरवर्षी नवरात्रात कोळी समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने देवीची पूजाअर्चा केली जाते. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नऊ दिवस दुर्गाडी किल्ल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.

आपली प्रतिक्रिया द्या