ऐतिहासिक रामगड किल्ल्यास गतवैभव, माहूरच्या सौंदर्यात भर, पर्यटन प्रेमींना पर्वणी !

861

राज ठाकूर, श्रीक्षेत्र माहूर

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळपीठ असलेले श्री रेणुकामातेचे मंदिर, सती अनुसयामाता, प्रभू दत्तात्रयाचे जन्मस्थान, माहानुभव पंथीयांचे देवदेवेश्वर, हिंदू मुस्लीम धर्मियांचे श्रद्धास्थान बाबा सोनापीर, बाब शेख फरिद वझरा, पांडवलेणी, मराठवाड्यातील सर्वात मोठी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती या सह सर्व देवदेवतांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर येथील रामगड किल्ल्याला मोठे महत्व आहे. पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने गडकिल्ले संवर्धन या योजने अंतर्गत या किल्ल्याच्या बुरुजाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर बुरुज पूर्णतः नव्याने बांधण्यात आला आहे. या बांधकामात पूर्वीसारखेच गुळ, चुना, बेल, तुरटी पंधरा दिवस भिजत घालून मिक्सरमध्ये रेतीसहित तुरटीचे पाणी टाकून काम करण्यात आले. याकामावर देगलूर व विदर्भातून दगड आणून कर्नाटक तेलंगना, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील कारागीरांनी काम केले आहे.

ऐतहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून २ हजार ६५० फुट तर ५७० मीटर उंची आहे. हा किल्ला ७० हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तीर्ण आहे. सदरील किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचा अखेरचा तट यादव राजा रामदेवाने बांधल्याने त्यास रामगड नावाने ओळखल्या जाते.

महानुभव पंथाच्या साहित्यामध्ये येथील तलावाचा इतिहास मिळतो. मध्ययुगीन कालखंडाचा माहूर हा साक्षीदार आहे. त्यानंतर महामणीच्या ताब्यातून चौदाव्या शतकात हा किल्ला गोंडानी घेऊन आपल्या राजकीय सत्तेचे केंद्र बनविले त्यानंतर इमादशाही व निजामशाही यांच्या त्या परिसरामध्ये मोठी लढाई होऊन हा किल्ला निजामांच्या ताब्यात गेला. नंतर १७ व्या शतकात हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. माहूर किल्ल्याचे किल्लेदार उदारामजी पत्नी सरस्वती रायबागन ही शिवकाळातील प्रसिद्ध स्त्री होती. ही अतिशय शूरवीर होती. औरंगजेबाने तिला स्त्रीशार्दुल हा किताब देऊन सन्मान केला होता. या घराण्यातील लोकांनी किल्ल्यातील बऱ्याच वास्तू बांधल्याचा उल्लेख मिळतो. अठराव्या शतकात या किल्ल्याचा ताबा गोंडराजा शंकर शहाकडे गेला. हटकर आणि निजामात १८८२ मध्ये लढाई झाली त्यात इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला निजामांच्या ताब्यात दिला. तो स्वातंत्र्यप्राप्ती पर्यत त्यांच्याच ताब्यात असल्याचे इतिहासात नमूद असल्याचे आढळते. सदरील किल्ल्यात धनबुरुज, महाकाली बुरुज, निशाण बुरुज, पहिल्या तटात १९ व विस्तारित तटबंदीत अठरा बुरुज, हत्ती दरवाजा, झरोका महल, कारंजे व हौद, चीनीमहल, बारूदखाना, राणी महल , दर्गाह, मजीद इत्यादी, वास्तू आढळतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या किल्ल्याची बऱ्याच वर्षापासून पडझड सुरु झाली होती. व दरवर्षी पावसाळ्यात किल्ला ढासळत चालला होता.

काळाच्या ओघात किल्ल्यातील वस्तू जीर्णावस्थेत आलेल्या होत्या मुख्यत्वे मागील काही वर्षात निशाण बुरुजाचे मोठे नुकसान होऊन जवळपास हे बुरुज पूर्णपणे कोसळले होते. बुरुजावर पूर्वी झेंडा फडकविला जायचा मात्र बुरूज कोसळल्याने झेंड्याचे ठिकाण बदलून महाकाली बुरुजावर करण्यात आले. निशाण बुरुज किल्ल्यातील एक मुख्य वास्तू असून या बुरुजावरून माहूर शहर व परिसरात नजर ठेवणे सहज शक्य होत असे. परंतु ते ढासळल्याने हे महत्व लक्षात घेता पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने गडकिल्ले संवर्धन या योजने अंतर्गत बुरुजाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सदर बुरुज पूर्णतः नव्याने बांधण्यात आला आहे. या बांधकामात पूर्वीसारखेच गुळ, चुना, बेल, तुरटी पंधरा दिवस भिजत घालून मिक्सरमध्ये रेतीसहित तुरटीचे पाणी टाकून काम करण्यात आले. याकामावर देगलूर व विदर्भातून दगड आणून कर्नाटक तेलंगना, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील कारागीरांनी काम केले आहे. माहूर शहरात प्रवेश करताच किल्ल्याचा बुरुज भाविक व पर्यटकांच्या नजरेत स्पष्ट पडत असल्याने माहूरच्या सौंदर्यात भर पडली आहे.

विशेष म्हणजे हे काम पूर्ण झाल्याने माहूर तीर्थक्षेत्रावर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने ही बाब माहूर शहराच्या इतिहासात अविस्मरणीय बाब ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया निसर्गप्रेमी व पर्यटनप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या