आझाद हिंद सेनेचा दैदिप्यमान इतिहास

478

>>नितीन शास्त्री

नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ातील एक सोनेरी पान. आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला लढा आजही देशवासीयांच्या स्मरणात आहे. या फौजेच्या स्थापनेला ७५ वर्षे होत आहे. या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही पुणेकर संस्थेने आझाद हिंद फौजेने ज्या मार्गे प्रवास केला त्याप्रमाणे सिंगापुर, मलेशिया, थायलंड, ब्रम्हदेश, हिंदुस्थानातील इंफाळ आणि कोलकाता अशा ठिकाणचा आगळावेगळा प्रवास आयोजित केला आहे. नामवंत लेखकांच्या तोंडून या फौजेच्या देदीप्यमान इतिहासाच्या आठवणी जागविण्यात येणार आहेत.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात अनेक संघर्ष झाले. त्यात १८५७चा उठाव आणि दुसऱया महायुद्धाच्या कालखंडात जपानच्या मदतीने पूर्व आशियात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला शसस्त्र लढा गाजला. या दोन्ही युद्धांत देशातील जनता प्रचंड संख्येने सामील झाली होती. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. ३० कोटी हिंदुस्थानी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी पूर्व आशियात राहणाऱया ३ कोटी हिंदुस्थानी नागरिकांनी या लढय़ाला साथ दिली. मलय, बर्मीस या समाजानेही खंबीरपणे या फौजेला साथ दिली. या समाजाने स्वातंत्र्ययुद्धात मोठी कामगिरी बजावली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेचे उद्दिष्ट दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्याचे होते. पण या फौजेने या किल्ल्यावर नाही, पण इंफाळजवळील मोइरॉगपर्यंत धडक मारली. तेथे तिरंगा फडकविला. त्या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे एक स्मारक उभारण्यात आलेले आहे. आझाद हिंद सेनेला आपले उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले; मात्र ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करता येउ शकतो असा आत्मविश्वास या फौजेने निर्माण केला. १८५७च्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी सैन्यामध्ये स्त्रीयांची फळी निर्माण केली होती. त्याच धर्तीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फौजेत स्त्रीयांची स्वतंत्र रेजिमेंट तयार केली. त्या रेजिमेंटला राणी झाशी यांचे नाव दिले. त्यामध्ये तीन हजार महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बंदुका घेऊन प्रत्यक्ष रणांगणावर उतरल्या होत्या.

सिंगापूर, मलेशियातील पेर्नांग, ब्रह्मदेशातील मिकिताला, मंडाले आणि रंगून या ठिकाणी आझाद हिंद सेनेने दिलेल्या लढय़ाच्या खुणा आजही ठळकपणे पाहावयास मिळतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रंगून आणि मंडालेजवळील असलेले निवासस्थान सुस्थितीत आहे. मिकिताला येथे आझाद हिंद सेनेचे ट्रेनिंग सेंटर होते. राणी झाशी रेजिमेंटचा सैनिकांचा सराव याच ठिकाणी होत असे. सिंगापूरच्या कॅफे सभागृहात ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केल्याची घोषणा केली ते सभागृह येथे आजही पाहावयास मिळते. याच परिसरातील रेसकोर्सवर जपानचे तत्कालीन सरसेनापती टोझो आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेकडून सलामी स्वीकारली होती ते रेसकोर्सचे मैदान आजही सुस्थितीत आहे.

आझाद हिंद फौजेने केलेले बलिदान आणि कार्य जनतेच्या समोर अमृत महोत्सवीवर्षानिमित्त येणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेने एक आगळय़ावेगळय़ा प्रवासाची आखणी केली आहे. वीस दिवसांच्या या प्रवासात सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ब्रह्मदेश, हिंदुस्थानातील इंफाळ आणि कोलकात्याला भेट देण्यात येणार आहे. या भागातील प्रेक्षणीय स्थळेही सहभागी होणाऱयांना दाखविण्यात येणार आहेत. ७५ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी आझाद हिंद फौजेचा देदीप्यमान इतिहास घडला तो प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, ब्रिगेडियर  हेमंत महाजन, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, लेखक प्रा.मिलिंद जोशी आणि सच्चिदानंद शेवडे यांच्याकडून ऐकण्याची संधी मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या