डरबनच्या इतिहासावर विराट सेनेचा फॉर्म भारी पडणार

31

सामना ऑनलाईन । डरबन

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गुरुवारपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये सहा एकदिवसीय सामने खेळले जाणार असून याची सुरुवात १ फेब्रुवारीला डरबनच्या किंग्जमेड मैदानापासून होणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत शेवटचा कसोटी सामना जिंकल्याने हिंदुस्थानी संघाचे मनोधैर्य उंचावलेले असले तरी डरबनचा इतिहास मात्र टीम इंडियाच्या विरोधात आहे.

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे तर दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात करण्यासाठी खेळाडूंना आपला फॉर्म दाखवावा लागणार आहे. हिंदुस्थानी खेळाडूंनी मागील काही एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केली आहे, तशाच कामगिरीची अपेक्षा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेत असणार आहे.

इतिहासाची भीती
डरबनच्या मैदानावर हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत सात सामने खेळले आहे. या एकाही सामन्यात हिंदुस्थानला विजय मिळवता आलेला नाही. सातपैकी सहा सामन्यात हिंदुस्थानचा पराभव झाला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. मात्र २००३मध्ये झालेल्या विश्वचषकात हिंदुस्थानने याच मैदानावर इंग्लंड आणि केनियाला धुळ चारली होती. तसेच हिंदुस्थानने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळलेल्या एकाही मालिकेत विजय मिळवलेला नाही. द.आफ्रिकेत हिंदुस्थानने सहा मालिका खेळल्या असून सर्वच्या सर्व मालिकांमध्ये पराभूत झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेत हिंदुस्थानने एकूण २८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त पाच सामन्यांमध्ये हिंदुस्थानला विजय मिळाला आहे, तर २१ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे तसेच २ सामने अनिर्णित राहिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या