नळ कनेक्शन कट करण्याचे आदेश दिल्याने मुख्याधिकाऱ्यांना मारहाण

33

सामना प्रतिनिधी । वैजापूर

थकीत मालमत्ता व नळपट्टीमुळे नळकनेक्शन कट करण्याचे आदेश दिल्याने मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार श्रीराम कॉलनी भागात घडला. या प्रकरणी गणेश जाधव याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नगरपालिकेच्या कर वसुली पथकातील विलास गडकर, रामचंद्र मोकळे, संजय जेजूरकर, अरुण कुलकर्णी, कृष्णा त्रिभुवन, भरत खुडे व जगन नन्नावरे हे कर्मचारी बुधवारी शहरातील झोन क्रमांक चारमध्ये वसुलीसाठी निघाले होते. हे पथक वसुली करण्यासाठी श्रीराम कॉलनी भागात सोनाली गणेश जाधव यांच्या घरी आले. या घराची मालमत्ता कराची थकबाकी ५ हजार ५७६ रुपये व नळपट्टीचे मागील तीन वर्षांचे ४ हजार ८०० रुपये असे एकूण १० हजार ३७६ रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी पथकाने सात ते आठ वेळा घरी जाऊनही संबंधितांना भरणा केला नाही. त्यामुळे नळ तोडण्याची कारवाई सुरू केली असता गणेश जाधव याने मला संपूर्ण शहराचे नगरपालिकेचे रेकॉर्ड दाखवा, कारवाई करण्यासाठी सीईओ किंवा कलेक्टरला बोलवा. त्याशिवाय नळ तोडू देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. याबाबत पथकातील नन्नावरे यांनी मुख्याधिकारी डाके यांना कळवले असता डाके यांच्यासह अभियंता प्रकाश पाटील, सुरेश दानापुरे व भागीनाथ त्रिभुवन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी डाके यांनी थकीत कर भरण्यास सांगितले असता गणेश जाधव हा डाके यांच्या अंगावर धावून गेला व त्याने शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी मुख्याधिकारी डाके यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून गणेश जाधवाच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या