हिवरेबाजार आणि मोरेचिंचोरेमध्ये महात्मा गांधींच्या स्वप्नांतील खेडी दिसतात – माजी न्यायमूर्ती चपळगावकर

374

खेडी स्वयंपूर्ण झाली तरच हिंदुस्थानचा दबदबा जगभरात निर्माण होईल, असे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नातील खेडी जागतिकीकरणाच्या काळात निर्माण होणे शक्य नाही. मात्र, पोपट पवार यांचे हिवरेबाजार आणि प्रशांत गडाख यांनी दत्तक घेतलेल्या मोरेचिंचोरे या गावांकडे पाहून खेड्यांबाबत आशावाद निर्माण होतो, त्या गावात मला नवे गांधी दिसत आहे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांनी केले.

सोनई ( ता. नेवासे ) यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने माजी न्यायमूर्ती व विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांना सामाजिक आणि डॉ. पी.डी. पाटील यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार व राहीबाई पोपेरे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी खासदार यशवंतराव गडाख उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहीत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी नेत्रदान ,वाचनालय ,स्पर्धा परीक्षा ,साध्या पध्दतीने विवाह, वृक्षसंवर्धन आदी क्षेत्रात काम करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला.

माजी न्यायमूर्ती चपळगावकर म्हणाले, आजची खेडी दुही व संघर्षाची केंद्रे झाली आहेत.त्यामुळे खेड्यांना स्वायत्तता देणे शक्य नाही. याबद्दल सर्वांचे एकमत आहे. आज खेड्यात राजकीय संघर्ष अधिक चालतो. विकासासाठी लोक एकत्र येत नाहीत. राजकीय नेते खेड्याच्या नावाचा जयघोष करतात. त्या नावावर मते घेतात. पण खेडी शहरात विलीन केली जातात. शहराच्या विकासावर खर्च केला जातो. युरोपातही खेडी आहेत. पण तेथे मागासलेपण नाही. त्यामुळे विकसित खेडी उभी राहिली पाहिजे. शिक्षणात महात्मा गांधींनी राष्ट्रीय शिक्षण ही संकल्पना मांडली. शिक्षणात स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, केवळ शिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधांपेक्षा गुणवत्ता ज्ञान याला महत्व दिले जावे, हे काम खेड्यात उभे राहिले पाहिजे , ग्रामीण शहाणपण शेती व शिक्षणात आले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम माजी खासदार यशवंतराव गडाख करत आहेत. त्यांची पुस्तके समाजासाठी प्रेरणादायी आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी दृकश्राव्य माध्यमातून संपर्क साधला, ते म्हणाले, आद्य दैवत ज्ञानेश्वर माऊली हे मराठीचे आद्यगुरू आहेत. त्यांच्या भूमीतील पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्य आहे. राज्याच्या सांस्कृतिक जीवनात गडाख यांनी आपली मुद्रा रेखाटली आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशांत गडाख हे नवनिर्मितीचे काम करीत आहे. ते वैभव असल्याचे ते म्हणाले. पद्मश्री पवार म्हणाले, गावातील समस्या वाढल्या असून हतबल होऊन बाजूला जाण्यापेक्षा वाट चुकलेल्या लोकांना पुन्हा संस्काराच्या मार्गाने नेले पाहिजे. पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या, मी गरिबी ,अडाणीपणा यावर मात करून खस्ता खाऊन देशी बियाणांकरिता काम केले.त्यात व्यक्तिगत स्वार्थ नाही तर समाजाचे भले करण्याचा उद्देश होता. नवी पिढी धडधाकट बनवायची असेल तर देशी गाय व देशी बियाणांची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या