‘हायवा’ लंपास करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 4 परप्रांतीयांसह 6 चोरट्यांना अटक

614

ग्रामीण भागातील समृद्धी महामार्गावर वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनाची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. चार परप्रांतीयांसह सहा चोरट्यांकडून पोलिसांनी हायवासह तीन कार, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 35 लाख 49 हजारांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वैजापूर तालुक्यातील डव्हाळामधील संतोष सुखदेव बोरुडे (42) यांची हायवा 8 जानेवारी रोजी डव्हाळा शिवारातील समृद्धी महामार्गावरून चोरट्यांनी लंपास केली होती. यावरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संभाजीनगर जिल्ह्यातून हायवा चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी हायवा चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश ग्रामीण गुन्हे शाखेला दिले होते. यावरून पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या पथकाने खबरे नेमुन हायवा चोरी करणाऱ्यांची माहिती घेत वैजापूर वांजरगावातील शिवाजी अशोक लहिरे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने समृध्द्धी महामार्गावरून चोरी केलेले दोन हायवा हे नाशिक येथील मेहुणा पिंटू ऊर्फ महेश भगवान बिरुटे ऊर्फ कहार याच्या स्वाधीन केल्याची कबुली दिली.

दोघांना ताब्यात घेताच फुटले आंतरराज्य टोळीचे बिंग
पोलीस निरीक्षक फुदे यांच्या पथकाने लहिरे व कहार या दोघांना ताब्यात घेताच त्यांनी चोरीच्या हायवा या गुजरात राज्यातील सुरतमधील अब्दुल कलाम महंमद इस्लाम चौधरी यास विक्री केल्याची कबुली दिली. कलाम चौधरी याने चोरीच्या हायवा धुळे आणि पंजाब राज्यात विक्री करण्यासाठी धुळे येथील ढाब्यासमोर ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी धुळे येथून हायवा (पीबी-06, एएस-5294) जप्त करत दिल्ली येथील किसनगंजमधील दिवाकर ऊर्फ छोटू एकनाथ चव्हाण (22), उत्तर प्रदेशातील शुबनेस कुमार दिनेशकुमार भाटिया (26), उत्तर प्रदेशातील मोहंमद इश्तियाक खान सफार खान यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून हायवासह तीन कार, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 35 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अब्दुल कलाम चौधरी टोळीचा म्होरक्या
उत्तर प्रदेश, उडसाईमधील अब्दुल कलाम इस्लाम चौधरी हा अट्टल गुन्हेगार असून तो हायवा चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे. यापूर्वी संभाजीनगर, श्रीरामपूर आणि भिवंडी येथे पकडले गेलेल्या हायवा चोरीतही अब्दुल चौधरीचा समावेश होता. तसेच अब्दुल कलामसह दिवाकर ऊर्फ छोटू एकनाथ चव्हाण, शुबनेसकुमार भाटीया मोहंमद इश्तियाक खान यांच्यावरदेखील गुजरात राज्यातील सुरत, नवसारी पोलीस ठाण्यात हायवा चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या