काहींच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूडची बदनामी करता येणार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

बॉलीवूडमधील काहींचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे; पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूड ड्रग रॅकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवूडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आत स्पष्ट केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज रॅकेटमधील तपासाबाबत बोलताना सिनेसृष्टीला बदनाम करणे योग्य नसल्याचे सांगितले ते म्हणाले,  बॉलिवूडशी संबंधित नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा गैरफायदा घेत परदेशातल्या हजारो फेक अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न कसे झाले, हे एव्हाना उघड झाले आहे. याच विचारधारेच्या लोकांनी आता मुंबई-बॉलीवूडला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. मात्र त्यांचे हे कारस्थान उधळून लावण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत.

उत्तरेकडे फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाल्यानंतर बॉलीवूडची बदनामी

देशाच्या उत्तरेकडे फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे  चित्रपटसृष्टीचे केंद्र असणाऱया मुंबईवर चिखलफेक सुरू झाली. कोटय़वधी रुपयांची उलाढाल असणाऱया मुंबईतल्या बॉलीवूडला बदनाम करणाऱयांचे यामागचे हेतू लक्षात घ्यायला हवेत. विशिष्ट विचारधारेतून बॉलीवूडवर हल्ले केले जात आहेत. गुन्हा घडून गेल्यानंतर अवतरणारे पोलिस फक्त सिनेमांमध्येच असतात. महाराष्ट्राचे पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे बॉलीवूडला बदनाम करु पाहणाऱयांनी विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला.

देशाच्या कोणत्याही भागातील कलाकारांचे महाराष्ट्रात स्वागत

बॉलीवूडला मुंबईतून हलवण्यासाठी काहींनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत. त्यांनी हे लक्षात घ्यावे की, हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीचे जनकच दादासाहेब फाळके हा कर्तृत्ववान मराठी माणूस आहे. भारताचा पहिला बोलपट ‘आलमआरा’ हादेखील देशात सर्वप्रथम (1931) मुंबईतच झळकला. शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी मुंबई हीच देशाच्या सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, आहे आणि राहील. भविष्यातदेखील देशातल्या कोणत्याही भागातील कलाकारांना बॉलीवूडमध्ये नशीब आजमावायचे असेल तर महाराष्ट्रातले पोलीस, जनता तुमचे स्वागतच करेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या