मी वेगळी

माझी हस्तकला : आरती अमेय गोगटे

handcraftदेवाने  प्रत्येकाला कोणती न कोणती कला भेट दिली आहे. आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजे. नोकरीत असेपर्यंत हस्तकलेशी माझा संबंध नव्हता. पाककलेची मनापासून आवड होती आणि आजही आहे. मात्र बाबांना कलाकुसर करण्याची आवड असल्याने माझ्या बालमनावर अप्रत्यक्ष संस्कार झाले होते. लग्नानंतर एखाद वर्ष नोकरी केली. पुढे मुलगा झाला आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. दिवसभर त्याच्या उशाशी बसून राहताना त्याची झोपेत तर माझी मोबाईलवर तंद्री लागायची. यूटय़ूबवर संचार करताना एकापेक्षा एक हस्तनिर्मित वस्तू पाहिल्या आणि ते करून पाहण्याची इच्छा निर्माण झाली. मग काय, घरातल्या अडगळीत पडलेल्या वस्तू आकार घेऊ लागल्या. माझ्या कलेला चालना मिळू लागली. वेगवेगळय़ा वस्तू बनवू लागले, भेट देऊ लागले.

कॉलेजमध्ये असताना शिवणकामाचा केलेला कोर्स कामी आला. बेबी फ्रॉक, परकर-पोलके, दुपटे, लंगोट असे लहान मुलांचे कपडे शिवताना आनंद मिळू लागला. माझ्या चंचल स्वभावामुळे मी हस्तकलेतल्या सगळय़ा शाखा धुंडाळल्या. कधी ग्रीटिंग केले, तर कधी वॉल हँगिंग, कधी सॉफ्ट टॉय बनवले, तर कधी गिफ्ट टॅग!

एकदा ओळखीतल्या काकांनी त्यांच्या सुनेसाठी हलव्याचे दागिने करशील का, म्हणून विचारले. मलाही ते करून पाहायचे होते. कोणताही पूर्वानुभव नसताना, कोणाचे मार्गदर्शन नसताना प्रयोग करत मी पहिल्याच प्रयत्नात नथ, तोडे, मंगळसूत्र, हार, कानातले, पैंजण, बाजूबंद, अंगठी असा पूर्ण सेट बनवून दिला. माझा आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून मी दरवर्षी संक्रांतीला हलव्याचे दागिने बनवून विकू लागले. आताही पुढल्या संक्रांतीसाठी माझ्या कामाला सुरुवात झाली आहे.

याशिवाय माझ्या मुलाची वेशभूषा स्पर्धा माझ्यासाठी पर्वणी असते. आजवर मी त्याला समर्थ रामदास, श्रावण बाळ, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, रानमांजर असे वेष परिधान करायला लावले. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारातून विकत न आणता मी स्कत: बनवल्या. माझा छंद जोपासायला वेळोवेळी माझ्या नवऱ्याने आणि घरच्यांनी साथ दिली. मुलगाही हौशी असल्याने तो माझ्या आनंदात सहभागी होतो. आज माझ्या घराचा आणि मनाचा एक कोपरा माझ्या कलेने भरून गेला आहे. जो नेहमीच मला माझ्या अस्तित्वाची जाणीव आणि समाधान देतो.

आपली प्रतिक्रिया द्या