जबलपूरमधून कॉल…मुंबईत न्यूक्लीयर बॉम्बहल्ला होणार

‘मैं इंडियन आर्मी का हू, मुंबई मै न्यूक्लीयर बॉम्ब से हमला होनेवाला है…’ असा कॉल गुरुवारी पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर राज्यातील सर्वच सुरक्षा यंत्रणांना ऍलर्ट करण्यात आले. जबलपूर येथे राहणाऱ्या जीतेश रमाकांत ठाकूर असे कॉलरने नाव सांगितले होते.

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला कॉल आला आणि कॉलरने तो इंडियन आर्मीचा असल्याचे सांगितले. जबलपूर येथून बोलणाऱ्या जीतेश ठाकूर याने मुंबई मे न्यूक्लीयर बॉम्ब से हमला होनेवाला है. मुंबईच्या कुर्ला, सीएमएमटी रेल्वे स्थानक तसेच शाहरुख खानच्या घराजवळ आणि खारघर सेक्टर-35 येथील गुरुद्वाराजवळसुद्धा बॉम्बस्फोट होणार असल्याचे त्याने सांगितले. एवढे सांगून त्याने फोन ठेवला. त्यानंतर तत्काळ याबाबत मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. तेथून मग डीजी कंट्रोल, एटीएस कंट्रोल, एसआयडी कंट्रोल, नवी मुंबई पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे पोलीस कंट्रोल रूमला सदर कॉलची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी सर्वच रेल्वे स्थानकांवर तपासणी सुरू केली. सुदैवाने काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. पोलिस जीतेश ठाकूरचा शोध घेत आहेत. जीतेश हा दारुडा असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या कॉलनंतर रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस तसेच नवी मुंबई पोलिसांनी तत्काळ सदर ठिकाणी जाऊन बॉम्ब स्कॉड व श्वानपथकाकडून तपासणी करून घेतली. जीतेशला पकडून मुंबईत आणल्यानंतरच त्याने असे कृत्य का केले ते स्पष्ट होऊ शकेल.