आरोग्य – छंद आणि आरोग्य

डॉ. अपर्णा गोविल भास्कर

मी माझ्या आजी आणि आईला भरतकाम, शिलाई, विणकाम, चित्रकला इत्यादी छंदांमध्ये गुंतलेले पाहत मोठी झाले. माझी आजीदेखील एक उत्तम वाचक होती आणि राजकारणापासून विज्ञानापर्यंत तसेच बोइंग विमान यांसारख्या विषयांवरही ती वाचन करत असे. जेव्हा तिची दृष्टी अंधुक झाली तेव्हा ती भिंगाच्या मदतीने वाचत राहिली. शेवटच्या श्वासापर्यंत ती प्रत्येक दिवसाची नव्या उत्साहाने आणि आनंदाने वाट पाहत असे. ती खऱ्या अर्थाने आयुष्य जगली. आज मला माझी आई तेच करताना दिसत आहे.

80 आणि 90च्या दशकांत लहानाचे मोठे होत असताना लहान मुलांसाठी मनोरंजनाचे फारसे पर्याय नव्हते. अभ्यासाव्यतिरिक्त कोणतेही कलागुणांना चालना देणारे अभ्यासक्रम वर्ग नव्हते. बुधवारी संध्याकाळी चित्रहार आणि रविवारी सकाळी रामायणापुरते दूरदर्शनवरचे कार्यक्रम मर्यादित होते. त्यावेळी व्हिडीओ गेम्सच्या नावाने अतिशय प्राथमिक अशी गॅजेटस् उपलब्ध होती. आज उपलब्ध असलेल्या उपकरणांच्या तुलनेत हे काहीच नव्हते. त्यामुळे आम्हाला छंद जोपासण्यासाठी बराच वेळ मिळाला. मोकळा वेळ, विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील वाचन, चित्रकला, हस्तकला आणि भरतकाम आणि कधी कधी लिखाणात वेळ घालवला जात असे.

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण करण्यात जवळपास एक दशक घालवले. त्यादरम्यान बाकी कशासाठीही वेळ काढता आला नाही. हजारो पानांच्या वैद्यकीय पुस्तकांचा अभ्यास, परीक्षा, रुग्णांची काळजी, शस्त्रक्रिया आणि अनेक पातळ्यांवर ताणतणावांना सामोरे जाणे याभोवतीच आयुष्य फिरत होते. आयुष्य घडले आणि माझ्या छंदांनी पूर्ण जागा घेतली.
जवळ जवळ 20 वर्षांनंतर जेव्हा मी पुन्हा चित्रकला सुरू केली तेव्हा मला माझे छंद पुन्हा नव्याने गवसल्याचा आनंद झाला. चित्रकलेने माझ्या जीवनाला अधिक अर्थ मिळाला. माझ्या मोकळ्या वेळेत मी चित्रकलेच्या विविध तंत्रांवर संशोधन करायला सुरुवात केली आणि कलेसंबंधित दुकानांना भेट दिली. आर्ट स्टोअरमध्ये खरेदी करण्यापासून ते सुंदर कलाकृती तयार करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेतला. सोशल मीडियावर माझी चित्रे शेअर केल्यानंतर मला मिळालेल्या प्रतिसादाचा मला आनंद झाला. चित्रकलेसोबतच आता मी एक छोटीशी बागही तयार केली आहे. मला माझ्या झाडांची काळजी घेणे खूप आवडते.

माझ्या छंदांना माझ्या आयुष्यात परत स्थान दिल्याने मला खूप सकारात्मकता मिळाली आहे. हॉस्पिटल आणि घरातील नेहमीच्या कर्तव्यापलीकडे जीवनाचा एक वेगळा उद्देश मला मिळाला आहे. त्यामुळे मला इतर लोकांवर असलेले भावनिक अवलंबित्व कमी करण्यास आणि माझ्या आयुष्यातून बरीच नकारात्मकता काढून टाकण्यास मदत झाली आहे. मी माझ्या स्वतःच्या सहवासातही आनंदी राहायला शिकले आहे आणि इतरांकडून कमी अपेक्षा ठेवू लागले आहे. मला आता पूर्ण समाधानी वाटते.

एक महिला डॉक्टर म्हणून मी अनेक महिला रुग्णांना भेटते, ज्यांना मूड डिसऑर्डर, आत्मसन्मानाचा व आत्मविश्वासाचा अभाव आणि बऱ्याच वेळा नैराश्याने ग्रासल्याचे दिसते. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण सर्वांनी चांगले आणि वाईट अनुभव घेतले आहेत. छंद हे असे साधन आहे की, जे आपल्याला जीवनातील अनेक परीक्षा आणि संकटांचा सामना करण्यास मदत करतात. छंद आपल्याला आपले मन एखाद्या समस्येपासून दूर ठेवण्यास, तणाव दूर करण्यास, नव्याने विचार करण्यास आणि रिफ्रेशमेंटसाठी मदत करतात. प्रत्येक महिलेने एखादा छंद जोपासण्याचा विचार करावा, तुम्हाला आनंद देणारी कला जोपासा. हे केवळ स्वतःसाठीच नाही, तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि विशेषतः मुलांनाही छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करा. आवडते खेळ पुन्हा खेळायला सुरू करा, वाद्य शिका, चित्रकला, विणकाम, शिवणकाम, नृत्य किंवा तुमच्या बकेट लिस्टमध्ये असलेले कोणतेही छंद जोपासा. प्रत्येक दिवस भरभरून जगा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

लेखिका बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, सैफी, नमाहा, अपोलो स्पेक्ट्रा आणि क्युरे स्पेशालिटी हॉस्पिटल्स इथे सल्लागार आहेत)