राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हिंदुस्थानी हॉकी संघाची घोषणा

13

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ‘हॉकी इंडिया’ने मंगळवारी १८ सदस्यीस हिंदुस्थानी संघाची घोषणा केली. ४ एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला असून या गटात पाकिस्तान, मलेशिया, वेल्स आणि इंग्लंड या देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. ७ एप्रिलला हिंदुस्थानचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

नुकत्याच झालेल्या सुल्तान अझलान शहा हॉकी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर ‘हॉकी इंडिया’ने पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूंवर आपला भरवसा दाखवलेला आहे. मात्र अझलान शहा हॉकी स्पर्धेत कर्णधार पद भूषविलेल्या सरदार सिंगला या संघातून वगळण्यात आले आहे. या स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करू न शकल्याचा फटका सरदारला बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधल्या फळीतील मनप्रीत सिंहच्या खांद्यावर संघाची धुरा सोपवण्यात आली असून चिंगलीस सानाला उपकर्णधार बनविण्यात आले आहे. मनप्रीतच्या नेतृत्काखाली हिंदुस्थानने २०१७ चा आशिया चषक आणि वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती.

ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह, हरमनप्रीत सिंह आणि गोलरक्षक पी.आर. श्रीजेशने या संघात पुनरागमन केले आहे. श्रीजेशसोबत सुरक करकेराला सहाय्यक गोलरक्षक म्हणून संधी देण्यात आलेली आहे. आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी संघ सध्या तयारी करतोय. त्याआधी हिंदुस्थानला आशियाई क्रीडा स्पर्धा, हॉकी विश्कचषक या महत्त्वाच्या स्पर्धांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूंच्या साथीने हिंदुस्थानी संघ राष्ट्रकुल स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

आपली प्रतिक्रिया द्या