हॉकी इंडियाचं स्तुत्य पाऊल, ऑस्ट्रेलियन वणवा पीडितांना 18 लाखांची मदत

410

ऑस्ट्रेलियातील जंगलात काही दिवसांपूर्वी भीषण वणव्यामुळे लागलेल्या आगीने थैमान घातलं होतं. या आगीत ऑस्ट्रेलियातील वन-संपदेचं मोठं नुकसान झालं. हजारो प्राण्यांना या आगीत आपला जीव गमवावा लागला, तर अनेक मुकी जनावरे जखमीही झाली. जगभरातून यादरम्यान ऑस्ट्रेलियात मदतकार्य पोहचत होते .या दुर्दैवी दुर्घटनेतील पीडितांना मदत म्हणून हिंदुस्थानी हॉकीचा कारभार पाहणाऱ्या हॉकी इंडियाने स्तुत्यअशी मदत दिली आहे . वणव्यातील पीडितांना हॉकी इंडियाने 25 हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे 18 लाखांच्या घरात) ची मदत मानवतावादी भावनेतून केली. हॉकी इंडियाच्या या पावलाचे ऑस्ट्रेलियन हॉकी महासंघासह जगातील क्रीडा क्षेत्रातील संघटनांकडून कौतुक होत आहे.

हॉकी ऑस्ट्रेलियानेही हिंदुस्थानकडून आलेल्या या मदतीबद्दल, हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांचे आभार मानले आहेत. कठीण प्रसंगात आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला केलेली मदत आम्ही नेहमी लक्षात ठेऊ, हॉकी इंडियाचे या मदतीसाठी मनापासून आभार, अशा शब्दांत हॉकी ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षा मेलेनी वुसनम यांनी हिंदुस्थानचे आभार मानले आहेत.

कर्णधार मनप्रीत, राणी रामपाल यांनी आपली जर्सी लिलावासाठी दिली
वणव्यात झालेलं नुकसान आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात ज्यांनी आपला प्राण गमावला, त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियात एका लिलावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जगभरातील विख्यात व्यक्ती आपापल्या वस्तु या लिलावात ठेवणार आहेत. हॉकी इंडियाने हिंदुस्थानी कर्णधार मनप्रीत सिंह आणि राणी रामपाल यांची सही असलेली जर्सी लिलावाकरता दिली आहे. या वणव्यात ऑस्ट्रेलियातली 46 लाखांपेक्षा अधिक झाडे जळून खाक झाली, काही इमारतींनाही या आगीची झळ बसली. शिवाय 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या