‘तेव्हा’ हात पकडणं हा लैंगिक अत्याचार नाही: हायकोर्ट

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

साथीदाराशी कोणत्याही प्रकारच्या भांडणात त्याने हात पकडणं हा लैंगिक अत्याचार असू शकत नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. सीएसआयआर(काउन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च)च्या कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे विधान कोर्टाने केलं आहे.

या महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. या संबंधित कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्याने तिचा हात पकडून तिला प्रयोगशाळेच्या बाहेर काढलं होतं. या कृतीवरून तिने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती विभू बाखरू यांनी हे मत व्यक्त केलं आहे. भांडण अथवा वादावादी होत असताना निव्वळ हात पकडणं म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे. एखाद्याच्या मनाविरुद्ध केलेली लैंगिक कृती हा लैंगिक अत्याचार या विभागात येतो, असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं आहे.

न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, सगळ्या प्रकारचा शारीरिक संपर्क हे लैंगिक अत्याचाराच्या पठडीत येऊ शकत नाहीत. फक्त जबरदस्तीने केलेली लैंगिक कृती किंवा स्पर्श हाच लैंगिक अत्याचारात समाविष्ट होतो. त्यामुळे सदर आरोपीविरुद्धचा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या