दापोली शहरातील मुख्य रस्त्यावर पडले भगदाड

दापोली शहरातून जाणाऱ्या दापोली-जालगाव-दाभोळ या महत्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. असे असले तरी रस्त्यावरील भगदाड बुजवण्यास नगर पंचायत प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष हे एखादयाचा बळी जाण्यास पुरेसा असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

दापोली शहरातून गिम्हवणे मार्गे हर्णे आंजर्ले केळशीकडे जाणारा, लाडघर बुरोंडीकडे जाणारा, खेर्डी पालगड मंडणगडकडे जाणारा, मौजे दापोली सारंग कळंबट वा बांधतिवरे वेळवी मांदिवलीकडे जाणारा किंवा टाळसुरे वाकवली खेडकडे जाणारा तसेच जालगाव शिर्दे कोळबांद्रे त्याचप्रमाणे जालगाव दाभोळकडे जाणारा मार्ग असे हे सर्व मार्ग दापोली शहरातूनच पुढे जातात हे सर्वच मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे आणि वर्दळीचे आहेत. असे शहरातून जाणारे रस्ते हे दापोली शहराच्या हद्दीतील मार्ग हे दापोली नगर पंचायत प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशाच रस्त्यांपैकी एक असलेला दापोली जालगाव उंबर्ले दाभोळ मार्ग आहे या मार्गावर दापोली शहराच्या हद्दीतच आझाद मैदानाकडे जाणा-या दिशेच्या ठिकाणी रस्त्यात मधोमध भगदाड पडले आहे. नेमके याच ठिकाणी स्टेट बॅक ऑफ दंडिया, बॅक ऑफ इंडिया, खेळासाठी असलेले आझाद नावाचे मैदान, शासकिय विश्रामगृह आणि जालगावकडे जाताना पेट्रोल पंप आहे, दापोली शहरातील सुप्रसिध्द अल्फ्रेड गॅडने अर्थातच ए.जी. हायस्कुल आहे. त्यामुळे या ठिकाणी विदयार्थी असतील, प्रवासी वर्गासह या ना त्या कामाच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता रस्त्यातील भगदाड हे सुरक्षेच्या कारणामुळे त्वरीत बुजवणे गरजेचे आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष हे एखादयाचा अपघात होऊन बळी गेल्यावर बुजवले जाणार आहे का? अशाप्रकारचा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

शहरात वावरणाऱ्या वा येथे दाखल होणाऱ्या पर्यटक अथवा प्रवाशांना या भगदाडामुळे होणारा धोका लक्षात घेऊन तातडीने नगर पंचायत प्रशासनाने लक्ष घालून रस्त्यात पडलेले भगदाड बुजवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.