
मुंबईसह राज्यभरात होळी आणि रंगपंचमी उत्साहात साजरी होत असली तर प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडले आहे. होळी स्पेशल पुरणपोळ्या बनवण्यासाठी लागणारे तेल, तूप, चणाडाळ, मैदा, गूळ, आणि वेलचीच्या दरांमध्ये तब्बल 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. तर सर्वांच्या पसंतीचे मटण आणि चिकनचीही किंमत वाढल्याने ‘होळी’चा बेत यंदा चांगलाच महागात पडला. कालपर्यंत 700 रुपये असलेला मटणाचा किलोचा भाव आज थेट 840 रुपये झाला. तरीही मुंबई-ठाण्यात मटणासाठी लांबच लांब रांगा लागल्या. किमान दोन तास रांगेत उभे राहावे लागत होते.
अशा वाढल्या किमती
- गतवर्षी 80 रुपये असणारा गूळ यावर्षी 100 रुपयांवर पोहोचला. तर चणाडाळ 75 रुपयांवरून 85 ते 90 रुपयांवर गेली.
- वेलचीचा भाव 25 ते 30 रुपये तोळ्यावरून 40 ते 50 रुपयांपर्यंत वाढला.
- मैदा 15 ते 20 रुपयांवरून 50 ते 60 रुपयांवर गेल्याने तयार पुरणपोळीची किंमतही वाढली.
- एक लिटर दुधाची किंमत मुंबईत सुमारे 85 रुपयांवरून थेट 98 झाल्याने दुग्धजन्य पदार्थांची किंमत वाढली.
- गतवर्षी सुमारे 140 ते 160 पर्यंत असणारी एक लिटर तेलाच पिशवी 185 वर पोहोचली.
उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू
बदलापुरात रंगाचा बेरंग झाला. रंग खेळल्यानंतर उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे बदलापूरच्या चामटोली गावावर शोककळा पसरली आहे. ही सर्व मुले पोद्दार सोसायटीमध्ये राहणारी होती. आर्यन सिंग (15) या मुलाला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकताच आर्यन मेडर (16), सिद्धार्थ सिंग (16), ओम सिंग (15) हे मित्र मदतीसाठी सरसावले. मात्र चौघांचाही बुडून मृत्यू झाला.