होळी… आदिवासींचा ‘होलिका’ मातेच्या आराधनेचा काळ!

>>डॉ. कांतीलाल टाटीया

होळी (उली) व दिवाळी (दिवाली) हे दोन सण उत्सव आदिवासींमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. ‘माता काजल’, ‘मोगी माता’, तशीच होळी माता (उली माता किंवा उली जोगला माता) असते. गावातील रोगराईला. साथीच्या आजाराला पंचक्रोशीतून हद्दपार करणे, गावात पीकपाणीची परिस्थिती चांगली राहावी, अन्नधान्याचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात यावेत, गावात सुखशांती, सुबत्ता राहावी यासाठी होळी मातेची (उली मातेची) पूजाअर्चा, आराधना करण्याची प्रथा आहे. गावावर वा कुटुंबावर संकट येऊ नये, संकट टळावे यासाठी मातेची मनोभावे पूजा करणे आवश्यक समजले जाते.

होळीचा सण प्रत्येक गावात त्यांच्या परंपरेनुसार ठरलेल्या दिवशी होतो. गावात संकट असेल, एखादी मोठी व्यक्ती गावातली मृत झाली असेल तर त्या वर्षाची त्या गावाची होळी लहान स्वरूपाची असते. तिला ‘गौऱ्याची होळी’ म्हणतात. प्रसाद वाटून होळीचा कार्यक्रम त्याच दिवशी संपवला जातो.

मोठी बांबूची होळी (टुकरान उली) ही मोठ्या उत्साहात, मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत साजरी करतात. प्रामुख्याने गावातील प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ३ किंवा ५ तरुणांवर होळीसाठी बांबू निश्चिती करणे व त्याला गावात होळीच्या दिवशी आणणे व तो बांबू आणताना जमिनीला टेकला जाणाऱ्याची काळजी घेणे ही जबाबदारी त्या तरुणांची असते. सातपुड्यातील भिल्ल समाज व पावरा समाज हा होळीचा आनंद सारखाच घेतात. मात्र यांच्या पद्धतीत थोडा फरक आढळून येतो.

भिल्ल समाजाच्या मान्यतेनुसार विण्यादेव व गांडा ठाकूर यांनी डोंगराखालील सपाटी प्रदेशातून युद्धात विजय मिळवला तो ‘होळी सिजा’ डोंगराभागात आणण्यासाठी. तेव्हापासून खालच्या (सपाटीवर) भागातील होळीसाठी ‘हावरा’चा दांडा वापरतात, तर पहाडावर बांबूचा होळीचा दांडा असतो. पावस समाजाच्या मान्यतेप्रमाणे एके दिवशी उलीमाता व दिवाली माता या दोन सख्ख्या बहिणींनी पृथ्वीवरील लोकांकडे पाहुणचार घेण्यासाठी जाण्याचे ठरवले. एकाच वेळी पृथ्वीवर गेलो तर लोकांना आदर सत्कार करण्यास जड जाईल किंवा एकीचा आदर सत्कार चांगला होऊ शकतो व दुसरीचा कमी म्हणून पृथ्वीवर जाताना दिवाळीने हिवाळ्यात तर होळीने हिवाळ्याच्या शेवटी जाण्याचे ठरवले. दिवे लावून दिव्याच्या रोषणाईत दिवाली मातेचे स्वागत करत उत्सव साजरा होऊ लागला, तर हिवाळा संपल्यावर लोक शेतीकामातून मोकळे होतात. झाडांना फळे आलेली असतात. जंगलात फुले फुललेली असतात. सगळीकडे आनंद ओसंडून वाहतो. अशा आनंदी वातावरणात उली मातेचे नाचत, बागडत ८-१५ दिवस कार्यक्रम ठेवत स्वागत करतात. गुलाल्या बाजार, भोंगऱ्या बाजार व मेळावा इ. कार्यक्रम ठेवले जातात.

गुलाल्या बाजार: होळी सणाच्या १५ दिवस अगोदर भरणारा बाजार हा ‘गुलाल्या बाजार’ असतो. परिसरातील आदिवासी सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करतात. वयस्कर मंडळी एकमेकांना बाजारात भेटल्यावर कपाळाला गुलाल लावून रामराम करत गळाभेट घेत क्षेमकुशल विचारतात. तरुणांसाठी वधू-वर संशोधनाचा महत्त्वाचा भाग बाजारात असयचा. बाजारात फिरणारी एखादी तरुणी आवडली की तिच्या गालाला गुलाल लावून आपली लग्नाची इच्छा जाहीर करतात. संमती म्हणून दोघे पळून जातात व लग्न लावतात. एखादी तरुणी मनात खूपच पटली तर एकट्याने किंवा मित्रांच्या मदतीने पळवून नेले जाते. पुढे गाव पंच बसून तरुणीची पसंती विचारात घेऊन लग्नाला मान्यता देतात. हल्ली गुलाल्या बाजारात वधू-वर संशोधन पद्धत जवळजवळ बंद झाली.

होळीसाठीचा खड्डा मागील वर्षी जेथे होळीचा बांबू गाडला होता तोच पहाराने खोदतात. त्यातील माती फावडाने न काढता हातानेच काढतात. पूजा करणारी मंडळी ज्यांची ‘पालणी’ केलेली असते तेच करतात. होळीचा बांबू त्या खड्ड्यात तेच रोपतात. आजूबाजूला लाकडे व गौऱ्या तेच लावतात. होळीचा बांबू खड्ड्यात रोपण्या अगोदर त्याच्या वरच्या टोकाला सजवतात, त्याला ‘ओली सिजा’ म्हणतात. खोबऱयाची वाटी, गव्हाच्या पुऱया, चण्याची चंदी (चिलखत), बांबूची टोपली/ सूप. इ. टोकाला बांधतात. होळीच्या पूजेचा मंत्र अश्वत्थामाच्या विनवणीने सुरू होत सर्व देवी-देवतांची, डोंगर नद्यांची, गाव परिसराच्या नावांचा उद्घोष करत शेवट बाखड देवाने (घरातील गायी गोठय़ापर्यंत) समाप्त होतो.

होळीची पालणी व बावा बुध्या आणि काली: घरातील एखादी व्यक्ती पूर्वी आजारी असेल, त्या कुटुंबावर एखादे संकट आले असेल व त्यातून त्याची मुक्तता झाली असेल किंवा ज्याला काही नवस बोलायचा असेल, असेच लोक भगत (पुजारा) सांगेल त्याप्रमाणे होळी नृत्यात ‘गट’ करून नाचतात. होळी माता प्रसन्न व्हावी म्हणून मनोभावे ‘पालणी’ करतात. यात होळीच्या आधी ५-१० किंवा १५ दिवस अगोदर ‘नेम’ करावा लागतो. होळीच्या ५ दिवस किंवा ३ दिवस अगोदर पूजा करून अंगावर दागिने चढवतात. आपला नवस फेडण्यासाठी भगत सांगेल त्याप्रमाणे किमान पाच होळीसाठी बाबा, बुध्या व कालीचे सोंग घेऊन नाचतात. ज्या व्यक्तीला कमरेभोवती भोपळे बांधून होळीत नाचण्यास सांगितले जाते. पायात लहान घुंगरू, डोक्यावर रंगीबेरंगी कागदाचा टोप किंवा पागोटे, हातात लाकडी तलवार किंवा डेंगा (काठी) अशा पेहरावास ‘बाबा’ म्हणतात. कमरेस मोठे पितळेचे घुंगरू, गळ्यात बाईचा साज, डोक्यावर मोरपिस, तोंडाला व अंगाला चुना किंवा होळीची राख असा पेहराव केलेल्यास ‘बुध्या’ म्हणतात. तोंडाला पूर्णपणे काळे फासलेले, हातात सूप, चाटू (लाकडाचा चमचा), अंगात पोलके आणि कमरेत घागरा व नृत्य करताना बाईसारखे हातवारे करतो त्यास ‘काली’ म्हणतात. अशाप्रकारे गट (टोळी) करून वेगवेगळ्या गावात होळीपुढे ही मंडळी नाचतात. ज्या गावाला जातात तेथील पोलीस पाटील त्यांना काही बक्षीस देतो. भगताने सांगितल्याप्रमाणे नवस फेडला जातो.

होळीची मांडणी झाल्यावर त्या पुढ्यात गोल करून गावोगावचे ढोल व त्यांच्याबरोबर आलेले बाबा, बुध्या, काली हे नाच करतात. पहाटे ५ वाजता गावचा पोलीस पाटील होळीची पूजा करून होळी पेटवतात. त्यानंतर परिसरातून आलेले बांधव होळीभोवती गोल रिंगणात  बसून होळीची मनोभावे पूजा करतात. होळी पेटल्यानंतर ‘होळी सिजा’ नाचणारे व गावकरी जमिनीवर पडू देत नाहीत. तो पडल्यावर त्याला पळवण्यासाठी एकच धावपळ असते. दुसऱ्या गावातील लोकांना ते पळवू देत नाहीत. होळी सिजाच्या खाली असलेला बांबू पोलीस पाटील, गावचे कारभारी, प्रमुख, शेजारील गावचे प्रमुख, मानाप्रमाणे त्यांना बोलावले जाते व दांडा एका दमात छोटा तुकडा पाडायचा असतो. तो तोडलेला बांबूचा तुकडा आपल्या घरात नेणे शुभ समजले जाते. एका घावात तुकडा तुटला नाही तर त्यास जोरात हसतात व त्याचा अपमान करतात. पेटलेल्या होळी मातेची दाळ्या, गूळ, सुपारी इ. टाकून पूजा करतात. होळीला फेर घालत जळत्या होळीतील गरम गरम राख मनोभावे कपाळाला लावण्यासाठी धावपळ करतात.