मढीमध्ये होळी उत्साहात साजरी!

282

नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतलेल्या तालुक्यातील मढी येथे सोमवारी रात्री मुख्य गडावर मढी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी होळीचा सण साजरा केला. होळीच्या 15 दिवस आधी होळीचा सण साजरा करणारे मढी हे देशातील एकमेव गाव आहे. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी गावातील होळी पेटवण्याचा मान हा गोपाळ समाजाचा असून या दिवशी मढी ग्रामस्थ होळीचा सण साजरा करत नाहीत. सार्वजनिक होळी पेटल्यानंतर मढी यात्रेला सुरवात झाली असल्याचे मानले जाते.

मढी येथील होळीच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून कानिफनाथांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी 15 दिवस आधीच येथील होळीचा म्हणजे भट्टीचा सण ग्रामस्थ एकत्र साजरा करतात. या होळीत भटक्या व दुर्बल घटकातील नागरिकांना विशेष मान दिला जातो. ही होळी झाल्यानंतर पंचमीला नाथांच्या समाधीला तेल लावण्याचा विधी केला जातो. हा विधी झाल्यानंतर ग्रामस्थ शेतीतील कामे बंद करतात. पलंग व गादीवर कोणीही बसत नाहीत,दाढी करत नाहीत,तळलेले व गोड पदार्थ खाणे बंद करतात. सोमवारी रात्री होळी पेटवण्यापूर्वी ग्रामस्थांनी मुख्य गडावर शेणाच्या गोवऱ्या आणल्या. त्या रचण्यात आल्यानंतर कानिफनाथांची आरती करण्यात आली. त्यानंतर मढी देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, विश्वस्त अप्पासाहेब मरकड, बाबासाहेब मरकड, बाबा कुठे, भगवान मरकड, विष्णू मरकड, सरपंच रखमाबाई मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांच्या उपस्थितीत होळीची पूजा करून होळी पेटवण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने नाथभक्त उपस्थित होते. कानिफनानाथांचा जयघोष या वेळी भाविकांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या