आटान रे आटान… नि कोरोनाला मारा बुटान रे… होरयो! कोरोनाने केली होळीची बोंब!

आटान रे आटान…नि कोरोनाला मारा बुटान रे…होरयो, अशी बोंब यंदा होळीला नक्कीच दिली जाईल. कारण यंदाच्या होळीची कोरोनानेच बोंब केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा शिमगोत्सव साधेपणाने आणि सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे होणार आहे. त्यामुळे होळी सणाला रत्नागिरीत जाऊ इच्छिणाऱया चाकरमान्यांचा हिरमोड झाला असणार हे खरेच, पण पर्यायच नाही.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज शिमगोत्सवासंदर्भात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. सामंत म्हणाले की, शिमगोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला रत्नागिरीतील देवस्थाननी पहिला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिमगोत्सवाची परंपरा आहे त्या परंपराचे पालन करत शिमगोत्सव साधेपणाने साजरा होणार असून देवस्थानांनीच 50 लोकांची मर्यादा निश्चित केली आहे.

यंदा पालखी नाचवणार नाही!

रत्नागिरीतील बारा वाडय़ांचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवा ट्रस्टचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी देवस्थानने शिमगोत्सवाची नियमावली तयार केल्याचे सांगितले. शहरातून पालखीची प्रदक्षिणाही वाहनातून केली जाणार आहे, जेणेकरून गर्दी टाळली जाणार आहे. भैरीबुवाचा शिमगोत्सव युटय़ुब,फेसबुकवर ऑनलाईन पाहता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या