कोकणच्या चाकरमान्यांचा गाडीतच शिमगा, होळी विशेष गाड्या चार ते पाच तास लेट

सामना ऑनलाईन, मुंबई

होळीसाठी कोकणात चाकमान्यांच्या सोयीकरिता मध्य रेल्वेने कोकण मार्गावर सोडलेल्या विषेश गाड्या सोयीपेक्षा गैरसोयीच्या ठरल्या. त्यामुळे सोमवारी कोकणात होळीसाठी पोहोचण्याच्या चाकरमान्यांचा उत्साहावर पाणी फेरले गेले. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोकणात होळीसाठी जाणारे शेकडो प्रवासी सीएसटीसह सर्वच स्थानकांवर अडकून पडले. चाकरमान्यांना गाडीतच शिमगा आणि धुळवड साजरी करावी लागली.

शनिवार, ११ मार्च रोजी मुंबईच्या दिशेने आणि रविवार, १२ मार्च रोजी मडगावच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही गाड्या सायडिंगला टाकल्याने या गाड्या सुमारे चार तासांहून अधिक लेट झाल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. सीएसटीहून मडगावसाठी जाणारी जादा गाडी रविवार, १२ मार्च रोजी रा. ११.५५ वाजता सुटणे अपेक्षित होते. पण मडगावहून निघालेली ही गाडी सुमारे चार तास लेट झाल्याने परतीच्या गाडीलाही फटका बसला. त्यामुळे रा. ११.५५ वाजताची (गाडी क्र. ०१००८९) गाडी सीएसटी वरून पहाटे ४.३० वाजता सुटली. बहुतांश प्रवासी रात्री ११ वाजता वा त्यापूर्वीच सीएसटी येथे पोहोचले होते. मात्र, ११.५५ वाजता सुटणारी ही गाडी तब्बल साडेचार तास लेट झाली! ही गाडी ओरोस येथे वेळापत्रकानुसार दुपारी १२ पर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. ती गाडी दुपारी ४ वाजता पोहोचली.

मडगावहून येणारी गाडी उशिराने सुटल्याने सगळे वेळापत्रक विस्कटले. शनिवार, ११ मार्च रोजी मडगावहून सुटलेली गाडी दादर येथे रविवारी पहाटे ३.३० वाजता पोहोचली. ही गाडी शनिवारी दुपारी कणकवली येथे चार वाजता पोहोचल्याने प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला. ट्रेन क्र. ०१०३४ ही करमाळी-सीएसटी विशेष गाडी ११ मार्च रोजी दुपारी सुटली खरी मात्र दादरला ती दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहचली. होळीसाठी विशेष गाड्या सोडूनही त्याचे योग्य नियोजन न झाल्याने चाकरमान्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

गाडीतच धुळवड साजरी करण्याची वेळ

१२ मार्च रोजी ११.५५ वाजता सीएसटीहून सुटणारी गाडी तब्बल ८ तास उशिराने पहाटे ४.३० वा. सुटल्याने आपण गावी संध्याकाळी धुळवड संपल्यावर पोहचल्याची प्रतिक्रिया सुहास तावडे यांनी दिली. आपण कल्याणहून ही गाडी पकडण्यासाठी सकाळी दहा वाजता निघालो होतो असे तावडे यांनी सांगितले. त्यामुळे गाडीतच धुळवड साजरी करण्याची वेळ आपल्यावर आल्याचे तावडे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या